spot_img
संपादकीय‘कन्हैय्या’चाच नव्हे अनेकांचा आधारवड हरपला!

‘कन्हैय्या’चाच नव्हे अनेकांचा आधारवड हरपला!

spot_img

विशेष संपादकीय / शिवाजी शिर्के
बर्‍याच गावांची ओळख व्यक्तीच्या नावाने होत असते! तसाच काहीसा प्रकार निघोजबाबत! कुलाब्यातील मच्छि मार्केटमध्ये निघोजकरांचा वरचष्मा कायम राहिला! कुलाबा आणि निघोज हे नातं त्यातूनच अधिक अतूट राहिलं! सातवीपर्यंत शिक्षण झालेलं असतानाही अगदी एखाद्या कृषी शास्त्रज्ञाला लाजवील अशी शेती करत दूध व्यवसायाच्या माध्यमातून निघोजचे नाव सातासमुद्रापार नेण्याचे काम करणार्‍या शांताराम मामा लंके यांच्या निधनाची बातमी घेऊनच शनिवारची (दि. ४ जानेवारी) सकाळ उजाडली. दत्ता उनवणे यांचा फोन झाला. मित्रवर्य सुरेश पठारे यांच्याकडून माहिती घेतली!


कन्हैय्या उद्योग समुहाचे सहकारी मित्र मच्छिंद्र लंके यांचे ते वडिल! सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या मामांना निघोज परिसरच नव्हे तर सर्वत्र मामा याच नावाने साद घालायचे! अनेकांच्या सुखदु:खात सहभागी होताना कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणार्‍या मामांचे पाय कायमच जमिनीवर राहिले. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण, शेती करताना गायी- म्हशींचा गोठा सुरू करणार्‍या मामांनी कन्हैय्या डेअरी सुरू केली. गरीबीचे चटके खात संसार उभा करतानाच समाजाचं आपण काहीतरी देणं लागतो ही भावना त्यांनी शेवटपर्यंत जपली. दुसर्‍याच्या डेअरीवर दूध घालणार्‍या मामांनी स्वत:ची डेअरी फक्त सुरूच केली नाही तर तीचा लौकीक आज सातासमुद्रापार गेला आहे. या प्रवासात आपल्याही गावात चित्रपट गृह (सिनेमा थिएटर) असावे या भावनेतून ग्रामीण भागातील पहिले सिनेमा थिएटर त्यांनी माता मळगंगेच्या नावाने सुरू केले. माता मळगंगेवर त्यांची अपार श्रद्धा! मळगंगा देवीसाठी आणि परिसर विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान सर्वश्रूत आहे.

मळगंगा डेअरीच्या माध्यमातून कन्हैैय्या हा ब्रँड तयार झाला. दूधाच्या जोडीने उपपदार्थ निर्मिती सुरू झाली. या पुढच्या प्रवासात त्यांचे चिरंजीव मच्छिंद्रशेठ लंके यांच्यावर मोठी जबाबदारी आली. प्रामाणिकपणा आणि सचोटी याची सांगड घालत या पिता- पुत्रांनी दूध व्यवसायात मोठी भरारी घेतली. पशुखाद्याशी निगडीत ‘कन्हैय्या अ‍ॅग्रो’हा पशुखाद्य कारखाना आज संपूर्ण राज्यात आणि राज्याबाहेर देखील आपली ओळख निर्माण करत आहे. माणसं जोडण्याच्या जोडीने ती जपण्याचं काम मामांनी सातत्याने केले आणि हेच काम मच्छिंद्र लंके हे करत आहेत. साधी राहणी आणि प्रसिद्धीपासून कायम दूर राहणारे मामा सार्वजनिक जीवनात वेगळा आदर्श ठेवून गेले. समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि गरीबांचे दु:ख आपले दु:ख समजून काम केलं पाहिजे अशी त्यांची भूमिका राहायची!

मळगंगा डेअरी, कन्हैय्या हे दोन उद्योग यशस्वीतेकडे वाटचाल करत असताना, भरारी घेत असताना त्याची जबाबदारी त्यांनी मच्छिंद्र लंके यांच्यावर सोपवली. त्यांनी कधीच त्यात लुडबूड केली नाही. अनेक धाडसी निर्णय मच्छिंद्रशेठ यांनी घेतले. परिणामांची चिंता न करता मामांनी मच्छुशेठ यांना भक्कम आधार देण्याचे काम केले. कमी वयात मोठी जबाबदारी मच्छुशेठवर दिल्यानंतर त्यांनी मार्गदर्शकाची भूमिका घेतली. आपला मुलगा कोणासोबत असतो, त्याची उठबस कोणासोबत, त्याचे मित्र कोण, रोजच्या धावपळीत तो घरी किती वाजता येतो याची इत्यंभूत माहिती मामांकडे असायची! हे सारं करताना त्यांनी त्रयस्थपणे निरीक्षणे नोंदवली आणि त्यातून प्रेरणा घेत, जबाबदारीचं किती मोठं आपल्यावर आहे याचे भान जपत गावातील सवंगड्यांचा मच्छु आज मच्छिंद्रशेठ झाला!

कोट्यवधी रुपयांची उलाढाल असणारा उद्योग उभा करताना सोबतच्या सहकार्‍यांना ताकद देण्याचे काम त्यांनी केले. आपल्या मुलाची ही प्रगती त्यांना नक्कीच अभिमानस्पद राहिली. मात्र, त्यांनी त्याचा बडेजाव कधीच केला नाही. त्यांच्या चेहर्‍यावरील समाधानची भावना बरेच काही सांगून जात राहिली.

पत्रकारीतेच्या माध्यमातून काम करत असताना मामांची आणि माझी ओळख झाली! ‘देशदूत’मध्ये असताना अशोक लांडे खून प्रकरणात टोकाची भूमिका घेत नगर शहरातील गुन्हेगारीवर सातत्याने लिखाण केले. याच दरम्यान मळगंगा डेअरीवर हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमासाठी तत्कालीन पोलिस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी यावे अशी भावना मामांनी व्यक्त केली. खरेतर ती सदिच्छा भेट होती. कृष्णप्रकाश साहेबांना मामांच्या विनंतीबाबत कल्पना दिली. त्यांनी तत्काळ ती मान्य केली आणि आम्ही सायंकाळी मामांच्या डेअरीवर पोहोचलो. यथोचित स्वागत आणि मानपान झाल्यानंतर मामांसह मच्छिंद्रशेठ यांच्या कामाचे कौतुक करत कृष्णप्रकाश साहेब निघण्यास बाहेर पडत असताना मामा त्यांच्याजवळ गेले. माझ्या गळ्यात हात घालत ते कृष्णप्रकाश साहेबांना म्हणाले, ‘आमच्या या पोराची काळजी घ्या साहेब, खूप डेअरींग करून लिहीत आहे’! मामा असं माझ्याबद्दल असं काही बोलतील असं वाटलंच नव्हतं! धाडसी पत्रकारीतेचं कौतुक करताना काळजी वाटणारे त्यांचे ते शब्द मला शनिवारी पुन्हा आठवले! मळगंगा आणि कन्हैय्या या दोन उद्योग समुहांच्या माध्यमातून निघोजची वेगळी ओळख निर्माण करणारे हे मामा म्हणजे मोठे विद्यापीठच! शिक्षण किती याहीपेक्षा जे शिक्षण घेतलंय ते समाजाच्या हिताचं किती हे जास्त महत्वाचं! मामांनी हे भान सातत्याने जपलं! त्यांच्या जाण्याने कन्हैैय्या उद्योग समुहाचाच नव्हे तर समाजातील रंजल्या- गांजल्यांचा आधारवड हरपला! त्यांच्या स्मृतीस ‘नगर सह्याद्री’ परिवाराची भावपूर्ण आदरांजली!

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री सरसावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला ; प्रशासनाला दिले असे आदेश

अतिवृष्टीने बाधित व्यक्तींना तातडीने मदत उपलब्ध करून द्या : पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील...

पुढचे २४ तास अलर्ट राहा! या जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस

मुंबई / नगर सह्याद्री राज्यात कालपासून परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. कालपासून महाराष्ट्रात अनेक...

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून पवार आक्रमक; देवभाऊंवर साधला निशाणा, म्हणाले आता आम्ही…

नाशिक / नगर सह्याद्री गेल्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात २,००० हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या...

खासदार निलेश लंके धावले अतिवृष्टीग्रस्तांच्या मदतीला; काय केले पहा

खा. नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अहिल्यानगर / नगर सह्याद्री - गेल्या तीन ते...