मुंबई / नगर सह्याद्री :
राज्य परिवहन महामंडळाकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात मार्च महिन्याचं ५६ टक्केच वेतन जमा करण्यात आलं आहे. तर उर्वरित वेतनाची रक्कम जमा करण्यात यावी, अशी मागणी एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच पूर्ण पगार द्या, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा थेट इशारच एसटी कर्मचारी संघटनांकडून देण्यात आला आहे. त्यानंतर आता मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थखात्यावर ताशेरे ओढले आहेत.
मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले, एसटी कर्मचाऱ्यांचा पगार मंगळवारी होईल. कोणत्याही परिस्थितीमध्ये प्रत्येक महिन्याच्या सात तारखेला एसटी कर्मचाऱ्यांचा पगार व्हायला हवा. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्माचाऱ्यांचा पगारही वेळत द्या, आम्ही अर्थखात्याकडे भीक मागत नाही अधिकार मागतोय, असं विधान करत प्रताप सरनाईक यांनी संताप व्यक्त केला. अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारताच मंत्री सरनाईक अॅक्शनमोडमध्ये आले आहेत. ते मुंबईमध्ये बोलत होते. यावेळी अजित पवारांवर प्रताप सरनाईक यांनी अप्रत्यक्ष निशाणा साधला.
कुठल्याही परिस्थीत प्रत्येक महिन्याच्या ७ तारखेच्या आता एसटी कर्मचाऱ्यांचा पगार होईल. पगारासाठी आम्ही वित्त खात्याकडे भीक मागत नाही, आमचा अधिकार मागतो. जर पगार वेळेवर पोहोचत नसेल, तर शोकांतिका आहे. आमची फाईल परस्पर आमच्याकडे पोहोचते, अशी नाराजीही यावेळी प्रताप सरनाईक यांनी बोलून दाखवली.
स्वारगेट प्रकरण घडल्यानंतर आम्ही आता सावध झालो असून अशा चुका होणार नाहीत याची काळजी घेऊ. नव्या बसेस मध्ये पॅनिक बटण आणि CCTV असेल. तसेच येत्या ५ वर्षात २५ हजार बसेस घेण्याचे मान्य करण्यात आले आहे. किती एसी बस आणि किती नॉन एसी बस लागतात याचा आढावा घेणार आहे, असंही प्रताप सरनाईक यावेळी म्हणाले.