अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
अहिल्यानगरचे नामांतर केल्यानंतर आता रेल्वेस्थानकाच्या नामांतराचीही प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या गृहमंत्रालयाकडून ना हरकत मिळाल्यानंतर यासंबंधीची अधिसूचना प्रकाशित केली आहे. त्यामुळे आता हे रेल्वेस्थानक अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर या नावाने ओळखले जाणार आहे.
गेल्यावर्षी शहर, तालुका व जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्यात आले. राज्य सरकारच्या अख्यारितील सर्व कार्यालयांची नावे बदलण्यात आली. मात्र, केंद्र सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या रेल्वेस्थानकाच्या नामांतराची प्रक्रिया राहिली होती. ती आता पूर्ण झाली आहे. राज्य सरकारने यासंबंधी पाठवलेला प्रस्ताव २ सप्टेंबर २५ ला केंद्रीय गृहमंत्रालयाने मंजूर केला आहे. त्यानुसार राज्य सरकारने रेल्वे स्थानकाचे नाव बदलल्याची अधिसूचना ११ सप्टेंबरच्या राजपत्रात प्रकाशित केली आहे. आता देशभरात रेल्वेकडून या स्थानकाचा उल्लेख अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर केला जाईल.
रेल्वेस्थानकाचे नाव बदलण्याची तांत्रिक प्रक्रिया रखडली होती. तीही आता पूर्ण झाली आहे. आता निवडणूक आयोगाकडे लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाच्या नावात बदल होण्याची प्रक्रिया बाकी आहे. राज्य सरकारच्या दृष्टीने अधिकृतपत्रे २०२४ मध्ये अहिल्यानगर नामकरण झाले आहे. असे असले तरी अद्याप अनेक ठिकाणी जुनाच उल्लेख होताना दिसतो. रस्त्यावरील पाट्या आणि काही कार्यालयांची नावे वगैरे ठिकाणी जुनेच नाव दिसून येते.