Crime: बीडच्या मस्साजोगचे सरपंच देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींवर कठोर कारवाई करण्यासाठी राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं आणि निषेध मोर्चे काढले जात आहे. अशात बीड जिल्हामध्ये पुन्हा तीन घटनांमुळे खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
दोन सख्ख्या भावांची हत्या महिला सरपंचाला खंडणीची मागणी आणि प्रेयसीने बोलणं बंद केल्याने थेट गोळीबार केल्याची घटना घडली.या घटनेनंतर पुन्हा एकदा बीडमधील शस्त्र परवाना आणि गावठी कट्टाचा मुद्दा समोर आला आहे.
भावांवर प्राणघातक हल्ला :
कडा (ता. आष्टी, जि. बीड) येथे जुन्या वादातून गुरुवारी (१८ जानेवारी) रात्री दहाच्या सुमारास वाहिरायेथे तीन सख्ख्या भावांवर त्यांच्याच समाजातील काही लोकांनी लोखंडी रॉड धारदार शस्त्रानेप्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात आजिनाथ विलास भोसले आणि भरत विलास भोसले या दोन भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसलेगंभीर जखमी झाला आहे. हे तिघे भाऊ आष्टी तालुक्यातील हातोळण येथील रहिवासी असून, ते वाहिरा येथे आले असताना रात्री काही लोकांनी त्यांच्यावर हल्ला केला. या प्रकरणी पोलिसांनी आठ संशयितांना ताब्यात घेतले आहे.
सरपंचाला खंडणीची मागणी
दुसऱ्या घटनेत, अंबाजोगाई (जि. बीड) तालुक्यातील ममदापूर पाटोदा येथील महिला सरपंच मंगल राम मामडगे यांना एक लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सरपंच मामडगे यांनी फिर्याद दिल्यानंतर माजी सरपंच, एक सदस्य व उपसरपंचाचे पती या तिघांविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच या महिला आहेत. आरोपी विकास कामात अडथळे आणतात, खोट्या तक्रारी देतात, मानसिक दबावटाकतात. १६ ऑगस्ट २०२४ रोजी जिल्हा परिषद शाळेच्या दुरुस्तीची कामे पाहण्यास जात असताना माजी सरपंच वसंत शिंदे, अनिल देशमुख व ज्ञानोबा देशमुख हे शाळेजवळ आले आणि त्यांनी, शाळा दुरुस्तीच्या कामासाठी आलेल्या चार लाख रुपयांपैकी एक लाख रुपये आम्हाला द्या, अशी मागणी केली, असा आरोप सरपंच मामडगे यांनी केला आहे.
प्रेमप्रकरणातून गोळीबार
तिसऱ्या घटनेत, अंबाजोगाई (जि. बीड) येथेच प्रेयसीने बोलणे बंद केल्याच्या रागातून एका माथेफिरू युवकाने तरुणीच्या घरावर गोळीबार केला. गणेश पंडित चव्हाण (२४) असे या गोळीबार करणाऱ्या युवकाचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. गणेशचे एका तरुणीसोबत प्रेमसंबंध (Relationship) होते. मात्र, त्याच्या त्रासाला कंटाळून तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. याचा राग मनात धरून गणेशने शुक्रवारी (१९ जानेवारी) सकाळी माऊलीनगरात तरुणीच्या घराचा दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही दरवाजा न उघडल्याने त्याने खिडकीतून गावठी कट्ट्यामधून गोळी झाडली. सुदैवाने घरातील सर्वजण दुसऱ्या खोलीत असल्याने, या गोळीबारात कोणीही जखमी झाले नाही.