हातात फलक, ओठांवर घोषणा घेऊन नागरिकांची स्वच्छता रॅली
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
शहरातील सर्वत्र साचलेल्या कचऱ्यामुळे शहराचे सौंदर्य हरवत आहे. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत, मात्र प्रशासन आणि नागरिक याबाबत शांत व निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. या परिस्थितीला वाचा फोडण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते भल्या सकाळी एकत्र आले. हातात फलक, ओठांवर स्वच्छतेच्या घोषणा देत त्यांनी सावेडी उपनगरातून स्वच्छता रॅली काढली. “रस्त्यावर कचरा नकोच आता…, नाही सहन होणार रस्त्यावरील घाण आता…”, स्वच्छ अहिल्यानगर सुंदर अहिल्यानगर…,, नको प्लॅस्टिक कापडी पिशवी हा पर्याय… अशा घोषणा देण्यात आल्या.
अहिल्यानगर मधील विविध सामाजिक संस्था व संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत नागरिक पायी चालत व काही सायकल चालवत सहभागी झाले. सावेडी येथील जॉगिंग पार्क मैदानावर स्वच्छता समितीच्या प्रमुख प्रतिभा धुत यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीस प्रारंभ केला.
स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी घोषणा देत ही रॅली कलानगर, गुलमोहर रोड, श्रीराम चौक, पाईपलाईन रोड, भिस्तबाग चौक, कृष्टधाम रोड, प्रोफेसर कॉलनी चौकातून जॉगिंग पार्क येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली.
रॅलीत सहभागी नागरिकांचे स्वागत हरीयालीचे अध्यक्ष सुरेश खामकर यांनी केले, प्रास्ताविक प्रा. दादासाहेब करंजुले यांनी केले सूत्रसंचालन राजेश परदेशी यांनी केले. या रॅलीमध्ये रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ प्रियदर्शनी, रोटरी क्लब ऑफ मिडटाउन, रोटरी क्लब ऑफ डिग्निटी, रोटरी क्लब ऑफ इंटिग्रिटी, लायनेस क्लब ऑफ अहिल्यानगर, अहिल्यानगर सायक्लिस्ट असोसिएशन, निरंजन सेवाभावी संस्था, युवान, ब्ल्यु जेम फाउंडेशन, शासकीय तंत्रनिकेतन, इंडियन डेंटल असोसिएशन नगर ब्रँच, तेजोदीप, महेश्वरी युवा संघ, अहिल्यानगर फिटनेस वर्ल्ड, माझी बाग, इंडीयन मेडीकल असोसिएशन आदी संस्था सहभगी झाल्या होत्या.
रॅलीच्या यशस्वितेसाठी प्रशांत दरेकर, सुभाष गर्जे, नितीन थाडे, डॉ. सुधा कांकरिया, शुभश्री पटनाईक, चंदन शहा, शुभा खंडेलवाल, संदीप कुसळकर, अमर गुरप, पुरुषोत्तम जाधव, चंद्रशेखर मुळे, नितीन पाठक, निलेश वैकर, आश्लेषा भांडारकर आदींनी नियोजन केले.