शहरातील विविध शाळांच्या सुरक्षेची मनविसेकडून पाहणी
अहमदनगर | नगर सह्याद्री
बदलापूर येथे घडलेली दुर्दैवी घटना पुन्हा कोणत्याही शाळेमध्ये घडू नये याची खबरदारी सर्व शैक्षणिक संस्थांनी घेणे आवश्यक आहे. याबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंबंधीच्या नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये झाली पाहिजे. शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थिनींच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य द्यावे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही त्रुटी, हलगर्जीपणा मनविसे खपवून घेणार नाही. ज्या शाळा महाविद्यालयांनी अद्याप सुरक्षेच्या उपाययोजनांची अंमलबजावणी केली नाही त्यांनी आठ दिवसांत कराव्यात, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष सुमित वर्मा यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगर शहर विद्यार्थी सेनेच्या वतीने शहरातील विविध शाळा व महाविद्यालयांची पाहणी करून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेेबाबत कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहेत, शासनाच्या अध्यादेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे होत आहे की नाही याची पहाणी सुमित वर्मा यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने करून मुख्याध्यापक व प्राचार्यांशी संवाद साधला. यावेळी मोठ्या संख्यने मनविसेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शहरातील शाळा महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे, शिक्षकेतर कर्मचार्यांची चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र घेणे, सखी सावित्री समिती, विशाखा समिती आदींबाबतची पहाणी आम्ही केल्याचे सुमित वर्मा म्हणाले. यामध्ये काही ठिकाणी बर्याच त्रुटी आढळल्या तर काही ठिकाणी सर्व नियमांचे काटेकोर पालन केले जात असल्याचे दिसले. ज्या संस्थांमध्ये सर्व काही व्यवस्थित आहे अशा संस्थांचा आम्ही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार देखील केला. पण ज्या ठिकाणी सुरक्षेबाबत त्रुटी आढळलेल्या आहेत त्यांना अजून आठ दिवसांची मुदत देत कडक शब्दांत ताकीद देत त्या संबंधित लेखी आश्वासन घेतले आहे.
सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड, हलगर्जीपणा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना खपवून घेणार नाही. यावेळी बर्याच शाळांनी विद्यार्थ्यांना टारगट मुलांचा होणारा त्रास आणि शाळा महाविद्यालय परिसरातील सुरू असलेल्या अवैध धंद्यांबाबत तक्रारी केल्या आहेत. याबाबत लवकरच जिल्हा पोलीस प्रशासनाची भेट घेऊन या अडचणी सोडविण्याची मागणी करणार आहोत. ही मोहीम एवढ्यावरच थांबणार नाही तर संपूर्ण जबाबदारीने पूर्णत्वास नेऊन विद्यार्थ्यांचे हित जपणार आहोत, असे ते म्हणाले.यावेळी मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश गायकवाड, युवती आघाडी जिल्हाध्यक्ष श्रद्धा खोंडे, शहराध्यक्ष अनिकेत शियाळ, तालुका सचिव अक्षय बेरड, अंबरनाथ भालसिंग, प्रवीण गायकवाड, आयुष नागरे, राहुल वर्मा, प्रसाद साळवे, रोमन भागवत, उपनगर अध्यक्ष रक्षंदा बोवर, समृद्धी बोवर, शहर उपाध्यक्ष सागर मेहसुनी आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.