मुंबई । नगर सहयाद्री:-
राज्यात दूध आणि संबंधित अन्नपदार्थांमध्ये होत असलेल्या भेसळीच्या घटनांवर कडक पावले उचलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारयांनी भेसळ करणाऱ्यांवर मोक्काअंतर्गत गुन्हे दाखल करण्यासाठी कायद्यात बदल करण्याची घोषणा केली आहे. विधान भवनात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत त्यांनी विविध सूचना आणि निर्णयांची माहिती दिली.
दूध आणि अन्नपदार्थांमध्ये भेसळ करणाऱ्यांविरोधात आता अधिक कडक कारवाई होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंबंधीच्या कायद्यात सुधारणा करून मकोका लावण्याची तयारी असल्याचे जाहीर केले. या प्रस्तावाला मंत्रिमंडळासमोर सादर करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विधानसभेत भोसे येथे उघडकीस आलेल्या भेसळीच्या प्रकारावर झालेल्या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने ही बैठक घेण्यात आली होती.
या बैठकीला अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, राज्यमंत्री योगेश कदम तसेच आमदार सुधीर मुनगंटीवार, विक्रम पाचपुते, अभिजीत पाटील, कैलास पाटील आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सोलापूर जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक (ग्रामीण) यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभाग घेतला. बैठकीदरम्यान अन्नात ॲनालॉग चीजचा वापर आणि त्यावरील कारवाईबाबतही चर्चा झाली.
दुधातील भेसळ शोधण्यासाठी प्रत्येक विभागात स्वतंत्र प्रयोगशाळा तातडीने सुरू कराव्यात, असे आदेश अजित पवार यांनी दिले. पनीरमध्ये जर ॲनालॉग चीज आढळल्यास, दुकानदारांनी ती माहिती ग्राहकांना दिसेल अशा ठिकाणी लावावी, अशी सूचनाही त्यांनी केली. यासोबतच भेसळीबाबत जनतेला जागरूक करण्यासाठी जनजागृती मोहीम राबवावी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करावा, पोर्टलही विकसित करावे, असेही ते म्हणाले.
दूध भेसळ प्रकरणांचा तपास जलद आणि अचूक व्हावा यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाला अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रसामुग्रीसाठी पुरवणी अर्थसंकल्पातून निधी दिला जाणार आहे. अपुरे मनुष्यबळ भरून काढण्यासाठी डेअरी विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची सेवा घेण्याचे आदेशही त्यांनी दिले असून, त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचेही सूचित केले.
सोलापूरमध्ये घडलेल्या दूध भेसळीच्या प्रकारात दोषी कोणताही व्यक्ती असो, तो कोणत्याही पक्षाचा किंवा कितीही मोठा असला तरी त्याला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना सोलापूरच्या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.