सांगली / नगर सह्याद्री –
भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे त्यांच्या वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत आहेत. आता सांगली दौऱ्यावर असताना केलेल्या त्यांच्या वक्तव्यावरून नवा वाद सुरू होण्याची शक्यता आहे. ‘आम्ही ईव्हीएममुळेच जिंकलो. पण, ईव्हीएम म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, असे वादग्रस्त वक्तव्य नितेश राणे यांनी केले आहे.
नितेश राणे सांगली दौऱ्यावर असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. सांगलीतील हिंदू गर्जना सभेत बोलताना नितेश राणे म्हणाले की, ईव्हीएमच्या नावाने विरोधक बोंबलत आहेत, कारण त्यांना सहन होत नाहीये की, हिंदू समाज एकत्र येऊन कसे मतदान करतो. विरोधकांना वाटत होते हिंदू समाज मतदान करायला एकत्र येऊ शकत नाही.
हे ईव्हीला ला दोष देतात, पण या लोकांना ईव्हीएमचा अर्थच माहिती नाही. हिंदू समाजाने कुठल्या विचाराने मतदान केलं हे विरोधकांना कळलाच नाही. ईव्हीएमचा अर्थ होतो ‘एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला’, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे.
जो नियम हिंदूंना लागू होतो तो इतर धर्माला देखील लागला पाहिजे. आता सरकार हिंदुत्ववादी आहे, आता कोणाचे लाड चालणार नाहीत, असे देखील ते यावेळी बोलताना म्हणाले. नितेश राणेंच्या ईव्हीएमविषयीच्या या वादग्रस्त वक्तव्याविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील विचारण्यात आले. मात्र, यावर प्रतिक्रिया देणे मुख्यमंत्र्यांनी टाळल्याचे पाहायला मिळाले.
दरम्यान, याच कार्यक्रमात बोलताना भाजपचे मिरजचे आमदार सुरेश खाडे यांनी देखील वादग्रस्त वक्तव्य केले. ‘आम्ही जरी दलित असलो तरी आम्ही हिंदू आहे, त्यामुळे आम्ही मागे नाही. आम्ही पण मिनी पाकिस्तानमध्ये लढतो. मी मिनी पाकिस्तानमधून चारवेळा चौकार मारत आमदार झालो आहे’, असे वक्तव्य खाडे यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.