पारनेर | नगर सह्याद्री
गेल्या पंधरा दिवसांपासून पारनेर तालुयात मुसळधार पावसाने थैमान घातले असून, ग्रामीण भागातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. विशेषतः तालुयाच्या उत्तर भागातील पळशी आणि परिसरात मेंढीपालनाचा व्यवसाय करणार्या शेतकर्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. पळशी येथील गाडेझाप परिसरात बाळू लिंबा ढेकळे या शेतकर्याच्या नऊ मेंढ्या पावसामुळे दगावल्या, तर सात ते आठ मेंढ्या गंभीर अवस्थेत आहेत.
सततच्या पावसामुळे मेंढ्यांना पुरेसा आहार आणि निवारा मिळाला नाही. परिणामी त्यांची प्रकृती खालावली. याबाबत पशु वैद्यकीय विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन मेंढ्यांची तपासणी केली आणि पंचनामा केला. मात्र, सततच्या पावसाने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. पळशी वनकुटे, ढवळपुरी, गाजदीपूर, वडगाव सावताळ परिसरात मेंढीपालन हा प्रमुख व्यवसाय असून, अनेक कुटुंबांचे उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. पावसामुळे चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, शेतकर्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे.
पळशी गावचे सरपंच प्रकाश राठोड, सामाजिक कार्यकर्ते गणेश हाके यांनी नुकसानग्रस्त मेंढपाळ व्यवसायिकांना तातडीने भरपाई देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
स्थानिक प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकर्यांना तातडीने मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. तथापि, सततच्या पावसामुळे शेती आणि पशुपालनावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांचे जीवनमान उद्ध्वस्त झाले आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे शेतकर्यांमधील चिंता वाढली आहे. प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मेंढीपालन करणार्या व्यावसायिक शेतकर्यांकडून होत आहे.
मेंढपाळांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी
पळशी, गाजदीपूर, वनकुटे, ढवळपुरी या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धनगर समाज असल्याने मेंढ्या पालन व्यवसाय केला जातो. सततचा अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे मेंढपाळांवर संकट आले आहे. अनेकांच्या मेंढ्या दगवल्या आहेत. शासनाने पशुवैद्यकीय विभागाच्या माध्यमातून उपाययोजना करून मेंढपाळांना आधार द्यावा व नुकसान झालेल्या मेंढपाळांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. – गणेश हाके (सामाजिक कार्यकर्ते)