आहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
मराठवाड्यासाठी जीवनदायिनी असणाऱ्या जायकवाडी प्रकल्पाच्या नाथसागर धरणात पाणीसाठा वाढत आहे. नाशिक येथे गोदावरीला आलेल्या पुरामुळे हा पाणीसाठा वाढला असून, धरण जुलै महिन्यातच 70 टक्के भरले आहे. मागील वष 10 जुलैला धरणात केवळ 4.13 टक्के पाणीसाठा होता. गतवषच्या तुलनेत यंदा 66 टक्के पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. यंदा धरणात 29 टक्के पाणीसाठा होता. मे महिन्यात नाशिक येथे मोठा अवकाळी पाऊस झाला व गोदावरी दुथडी वाहून पूर परिस्थिती निर्माण झाली.
त्यामुळे पुराचे पाणी जायकवाडी धरणात येण्यास सुरवात झाली. यानंतर जूनमध्येही नाशिकला चांगला पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली. जुलैच्या सुरवातीपासून नाशिक येथे मुसळधार पाऊस सुरू राहिल्याने गोदावरीची पूरस्थिती आठ दिवस कायम राहिली. परिणामी या पुराचे पाणी पुन्हा जायकवाडीच्या दिशेने झेपावले आणि नाथसागरामध्ये भरमसाट वाढ झाली. पाणीपातळीने सत्तरीची आकडेवारी ओलांडल्यामुळे धरण प्रशासन सतर्क झाले असून विविध प्रकारची सतर्कता घेतली जात आहे.दरम्यान गोदाकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे.
मुळा धरणही 70 टक्के भरले
अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या मुळा धरणातून यंदा जुलैच्या सुरुवातीलाच पाणी नदीपात्रात सोडण्यात आले आहे. धरण पाणीसाठा 70 टक्के पर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे धरणाच्या सर्व 11 दरवाजातून मुळानदी पात्रात पाणी सोडले आहे. मे महिन्यातच यंदा मुळा धरणात अर्धा टीएमसी पाणी अवकाळी पावसाने जमा झाले होते. जून मधील पावसाने विक्रमी कामगिरी केल्याने धरण साठ्यात, झपाट्याने वाढ होत राहिली.
जून महिन्यात व जुलैच्या सुरुवातीला पावसाने सर्वत्र दमदार बॅटिंग केली. तसेच बॅटिंग मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झाली जून अखेर निम्मी भरत आले, पावसाचा जोर कायम राहिल्याने धरण परिचलन सूचीनुसार धरण पाणीसाठा 18 हजार 150 दशलक्ष घनफूट होताच बुधवारी दुपारनंतर जलसंपदा विभागाच्या मुळाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या हस्ते व शेतकरी संघटनेचे रवींद्र मोरे यांच्या उपस्थितीत काल दुपारी बटन दाबून धरणाच्या सर्व 11 दरवाजांमधून एकूण 3 हजार मुळा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले.
भंडारदरा 71 तर निळवंडे 82.67 टक्के
सह्याद्रीच्याही घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे भंडारदरा धरण व निळवंडे धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरु आहे. भंडारदरा धरणात सध्या 71 टक्के पाणीसाठा झाला असून निळवंडे धरण सध्या 82.67 टक्के भरले आहे. घाटमाथ्यावर पावसाचा जोर कायम टिकून असल्यामुळे धरणात पाण्याची आवक सुरु आहे. त्यामुळे जर पाऊस असाच सुरु राहिला तर जुलैमध्येच हे दोन्ही धरणे ओहरफ्लो होतील असा अंदाज बांधण्यात येत आहे.