अकोले । नगर सहयाद्री:-
भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रातील घाटघर, रतनवाडी, पांजरे आदी परिसरात दमदार आषाढ सरी कोसळू लागल्याने धरणात नवीन पाण्याची आवकही कमालीची वाढली आहे. यामुळे मंगळवारी सायंकाळी ६ वाजता भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ६७३२ दलघफू (६०.५८ टक्के) तर निळवंडेचा ४२५८ दलघफू (५१.१३ टक्के) झाला आहे. आढळा धरणही लवकरच पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असून, ९९१ दलघफू (९३.४९ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
दोन दिवसांपासून पाणलोटक्षेत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे भंडारदरा मध्ये मंगळवारी ६ वाजेपर्यंत ३५९ दलघफू नवीन पाणी जमा झाले. तर निळवंडेत १७९ दलघफू नवीन पाणी दाखल झाले. तसेच वाकी तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असल्याने कृष्णावंती नदी वाहती आहे. दरवर्षी, १५ ऑगस्ट पर्यंत भंडारदरा धरण भरत असते, परंतु यंदा जुलै महिन्यातच दोन्ही धरणे ओव्हर फ्लो होण्याची शयता आहे.
जायकवाडीमधेही ६० टक्के साठा
गोदावरीच्या लाभक्षेत्रातही जोरदार पाऊस सुरु आहे. दारणा, गंगापूर धरणातही पाणीसाठा वाढला आहे. जयकवाडीकडेही गोदावरीतून विसर्ग होत असल्याने जायकवाडी जलाशयात मंगळवारी सायंकाळी ६ वाजता उपयुक्त साठा ४४.६४ टक्के इतका झाला होता. जायकवाडीत मंगळवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार मृतसह एकूण साठा ६०.३० टक्के इतका साठा आहे, उपयुक्त साठा ४४.६४ टक्के इतका झाला आहे.