जामखेड । नगर सहयाद्री:-
नान्नज (ता. जामखेड) येथे २४ ऑगस्ट रोजी रात्री सुनिल साळवे यांच्या कुटुंबावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्याप्रकरणी कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. घायवळ आणि त्याचा साथीदार ऋषी गायकवाड यांनी या हल्ल्याचा कट रचल्याचा ठपका ठेवत जामखेड पोलिसांनी दोघांनाही या गुन्ह्यात आरोपी केले आहे.
याप्रकरणी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, २४ ऑगस्टच्या रात्री नान्नज येथे सुनिल साळवे व त्यांच्या कुटुंबीयांवर तलवार, काठ्या व इतर प्राणघातक शस्त्रांनी हल्ला करण्यात आला होता. यात साळवे कुटुंबीय जबर जखमी झाले होते. याप्रकरणी जामखेड पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे यांनी सखोल व तांत्रिक तपास सुरू केला. या तपासातच या हल्ल्यामागे कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा सहभाग असल्याचे ठोस पुरावे पोलिसांच्या हाती लागले. निलेश घायवळ हा मूळचा सोनेगाव (ता. जामखेड) येथील रहिवासी असून, पुणे शहरात त्याच्यावर खून, खंडणी, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दहशत माजवणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश घायवळ व त्याचा साथीदार ऋषी गायकवाड यांनी संगनमत करून कट रचला. त्यानंतर आपल्या साथीदारांमार्फत सुनिल साळवे यांच्या कुटुंबीयांवर धारदार शस्त्रांनी हल्ला करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे घायवळ व गायकवाड यांना या गुन्ह्यात आरोपी करण्यात आले आहे. सदर गुन्ह्यात आत्तापर्यंत एकूण ०९ आरोपींना अटक करण्यात आली असून, उर्वरित आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. या गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण लोखंडे हे स्वतः करत आहेत.



