Crime News: खेड तालुक्यातील दौंडकरवाडीमधील व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने मानसिक त्रास देणाऱ्या ग्रामसेवकाविरोधात चिठ्ठी लिहून ठेवली होती. रमेश मच्छिंद्र मोहिते (वय ४५) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
याप्रकरणी आकाश रमेश मोहिते (वय २४, रा. दौंडकरवाडी, ता. खेड) यांच्या फिर्यादीवरून ग्रामसेवक विष्णू लक्ष्मण गाडीलकर (रा. शिरूर), भास्कर जाधव, विलास भास्कर जाधव, संजय भीमराव जाधव, रुपेश दौंडकर, एक अनोळखी व्यक्ती आणि दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दौंडकरवाडी येथे रमेश मोहिते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्यांनी दोन चिठ्ठया लीहल्या होत्या. एक चिठ्ठी त्याने निघोजे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांच्या विरोधात तर दुसरी भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांच्या विरोधात होती.
पहिल्या चिठ्ठीत निघोजे ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विष्णू गाडीलकर यांनी केलेल्या कामाचे दीड लाख रुपये दिले नाहीत. ते मागितले असता देणार नाही असे म्हणत तुमचे कुटुंब बरबाद करीन अशा आशयाचा मजकुर लिहला होता.
तर दुसऱ्या चिठ्ठीत फिर्यादींचा भाऊ विकास यांच्या सासरकडील लोकांनी भाऊ विकास आणि वडील रमेश यांना जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे म्हटले आहे. या दोन्ही कारणांवरून आपण आत्महत्या करत असल्याचे रमेश यांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.