मुंबई । नगर सहयाद्री:-
महाराष्ट्रात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांत मुसळधार पावसाने जोर धरला असून, भारतीय हवामान खात्याने (आयएमडी) आगामी 48 तासांत तुफान पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज रविवारी मुंबई, पुणे, रायगड, रत्नागिरी, ठाणे, आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यभरात पुढील चार दिवसांत पावसाची स्थिती कायम राहील. हवामानतज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी सांगितले आहे की, मराठवाडा आणि विदर्भात तुफान पावसाची शक्यता आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, धाराशिव, आणि परभणीत विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडेल.
विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, वाशिम, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांतही जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, नंदुरबार, धुळे, आणि जळगाव जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यासह घाटमाथ्यावर अतिवृष्टीची शक्यता आहे.
मुंबई आणि पुण्यात रविवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली असून, येत्या काही तासांत पावसाचा जोर आणखी वाढणार आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असून, गरज असल्यासच घराबाहेर पडावे असे सांगितले आहे.