Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. या योजनेत आता महिलांच्या अर्जांची पडताळणी सुरु झाली आहे. ज्या महिलांना नियमांत न बसतानादेखील योजनेचा लाभ घेतला आहे त्यांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. आतापर्यंत जवळपास साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. दरम्यान, आता लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
आता लाडकी बहीण योजनेत महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. दरवर्षी जून महिन्यात आता महिलांना ई-केवायसी करावे लागणार आहे. जेणेकरुन महिलांची सर्व माहिती खरी आहे की खोटी याची माहिती मिळणार आहे. या योजनेत तब्बल २ कोटी ६३ लाख महिलांनी अर्ज केला होता. त्यातील २ कोटी ४१ लाख महिला पात्र ठरल्या होत्या. दरम्यान, अजूनही ११ लाख महिलांच्या अर्जांची पडताळणी बाकी आहे. या महिलांचे बँक अकाउंट आधार कार्डशी जोडले गेले नाही.
गेल्या आठवड्यापासूनच लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या अर्जांची तपासणी सुरु झाली आहे. आता उत्पन्नाची पडताळणी होणार आहे. आयकर विभागाकडे ज्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखांपेक्षा जास्त आहेत. त्या महिलांना योजनेतून वगळण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.लाडकी बहीण योजनेत काही सुधारणा करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. संजय गांधी निराधार योजनेचा लाभ गेत असलेल्या २.३ लाख महिलांना बाद करण्यात आले आहे.
त्यानंतर आता ज्या महिला सरकारच्या इतर योजनांमधून १५०० किंवा त्यापेक्षा जास्त रुपयांचा लाभ घेतात. त्यांनाही वगळण्यात येणार आहे. लाडकी बहीण योजनेत आता दरवर्षी १ जून ते १ जुलै या काळात ई-केवायसी केले जाणार आहे.लाभार्थी महिला आहे की नाही तसेच त्यांची माहिती खरी आहे की नाही यासाठी केवायसी केले जाणार आहे.