जिल्ह्याचा गाडा आता नव्या दमाच्या अधिकाऱ्यांच्या हाती | जिल्हाधिकाऱ्यांपाठोपाठ आता जिल्हा परिषद सीइओ अन् पोलीस अधीक्षकही बदलले
सारिपाट / शिवाजी शिर्के
मागील महिन्यात जिल्हाधिकारी म्हणून पंकज आशीया यांनी पदभार घेतल्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून सोमनाथ घार्गे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आनंद भंडारी हे दोघे दाखल झाले आहेत. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आणि गुन्हेगारीवर वचक मिळविण्याचे मोठे आव्हान घार्गे यांच्यासमोर असणार आहे. दुसरीकडे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेत आनंद भंडारी यांची नियुक्ती झाली आहे. घार्गे यांनी यापूर्वी नगरमध्ये श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी म्हणून काम केले आहे आणि त्यांनी त्यांच्या कारकिदत गुन्हेगारांचे कंबरडे मोडले होते. आनंद भंडारी हे जिल्ह्यात पहिल्यांदाच येत असले तरी त्यांना हा जिल्हा परिचीत आहे. जिल्ह्याच्या सीमेशेजारीच त्यांचे बेल्हे (जुन्नर) हे मुळ गाव आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या बद्दल आणि विशेषत: येथील राजकीय गटतटाच्या बद्दल त्यांना नक्कीच माहिती आहे. पंकज आशीया यांनी अवघ्या महिनाभरात आपल्या कामाचा ठसा उमटवला असताना आता या दोन अधिकाऱ्यांना देखील जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका घ्यावी लागणार आहे.
महसूल, झेडपी अन् पोलीस विभागात बदल्यांचा महिना!
मे आणि जून महिना हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा महिना मानला जातो. महसूल, झेडपी अन् पोलिस या तीनही प्रमुख विभागाचे अधिकारी आता नव्याने दाखल झाले आहेत. या आधीच्या अधिकाऱ्यांनी काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात काही प्रशासकीय, काही विनंती तर काही तक्रारीच्या बदल्या होत्या. काहींच्या बदल्या झाल्यानंतर त्यातील काही कर्मचारी त्या जागेवर जवळपास वर्षभर राहिले. मात्र, यातील तीनही अधिकाऱ्यांनी खमकी भूमिका घेतली आणि त्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. आता महसूलसह पोलिस आणि झेडपीचे नवे कारभारी आले असताना या वादग्रस्त कर्मचाऱ्यांनी विनंती बदलीचे अर्ज तयार केले असल्याचे समोर आले आहे. यातील काहींनी पती-पत्नी एकत्रीकरणाच्या नियमावर बोट ठेवल्याचेही समोर आले आहे. मात्र, सात महिन्यात या कर्मचाऱ्यांना पुन्हा पहिल्या ठिकाणी पोस्टींग दिल्यास त्यातून अनेक तक्रारी होणार आणि या तीनही अधिकाऱ्यांवर पैसे घेतल्याचा आरोपही होणार! त्यामुळे बदल्यांचे प्रकरण हाताळताना काळजी घ्यावी लागणार हे नक्की!
कलेक्टर साहेब अन् एसपी साहेब, जमलं तर इकडेही लक्ष द्या!
जिल्हाधिकारी पंकज आशीया यांनी महिनाभरात आपल्या पारदश आणि झटपट निर्णयाचा धडाका लावल्याने ते सामान्य जनतेच्या गळ्यातील ताईत झाले आहेत. कामासंबंधीचा कोणताही कागद, फाईल समोर आली की त्यावर लागलीच निर्णय आणि शेरा मारताना संबंधीत अधिकाऱ्यांच्या मोबाईलवर त्याचा आदेश देण्याची जिल्हाधिकाऱ्यांची कार्यपद्धती प्रशासनास अधिक गतीमान करणारी ठरली आहे. सोमनाथ घार्गे यांनी रायगड मध्ये काम करताना आपल्या कामाचा उमटवलेला ठसा आणि अधिकारी- कर्मचाऱ्यांकडून मिळविलेला विश्वास आता त्यांना नगरमध्ये देखील मिळवावा लागणार आहे. महसूल आणि पोलिस या दोन्ही विभागातील काही बदमाश अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मे- जून या बदलीच्या महिन्यातच दोघांनाही खड्यासारखे बाजूला करावे लागणार आहे. तरच या दोन्ही विभागाची प्रतिमा अधिकाधिक स्वच्छ होणार आहे.
लष्करी हद्दीतील अवैध वाळूउपसा थांबेल का?
खारे कर्जुने, भाळवणी परिसरातील वाळू तस्करांकडून लष्कराच्या केके रेंज हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा केला जातो. विशेषत: बोटीने उपसा करण्यापर्यंत आता तस्करांची मजल गेली आहे. या विरोधात स्थानिक ग्रामस्थांनी तक्रार केली तरीही महसूल आणि पोलिस यांच्याकडून त्याची दखल घेतली जात नाही. नगर आणि पारनेर तहसील कार्यालयातील अधिकाऱ्यांनाच हप्ते दिले जात असल्याची जाहीर चर्चा असून कारवाई होत नसल्याने त्याला पुष्टी मिळत आहे. पारनेर आणि एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनाही हप्ते दिले जात असल्याचेच जाहीरपणे समोर येत आहे. वाळू तस्करांच्या दावणीला महसूलचे अधिकारी आणि पोलिस अधिकारीही बांधले गेले असल्याचे लपून राहिलेले नाही.
खाकीतील बदमाशांसह व्हाईट कॉलर गुंडागदसाठी खमकी भूमिका!
श्रीरामपूरमध्ये उपअधीक्षक म्हणून काम करताना सोमनाथ घार्गे यांनी गुंडांच्या विरोधात टोकाची भूमिका घेतली होती. त्यातूनच अण्णा लष्करेसारख्या टोळीला देखील घाम फुटला होता. पोलिस अधीक्षक म्हणून आता घार्गे हे नगरमध्ये दाखल झालेत आणि त्यांनी पदभार देखील घेतला. जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक आणि गुन्हेगारीचा सातबारा त्यांना पाठ आहेच. आता फक्त तो दुरुस्त करण्यासाठी खमकी भूमिका त्यांना घ्यावी लागणार आहे. गुन्हेगारांमध्ये घार्गे यांच्याबद्दल धाक आहेच. त्यांचा बंदोबस्त तर होईलच! मात्र, खाकीतील काही बदमाशांना शोधून त्यांचे गुन्हेगारांशी असणारी संबंध शोधण्याचे काम घार्गे यांना करावे लागणार आहे. याशिवाय व्हाईट कॉलर गुंडांना शोधून त्यांचाही सातबारा लिहिण्याचे काम घार्गे यांना करावे लागणार आहे. तर आणि तरच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधीत असल्याचे दिसून येणार आहे.
गुन्हेगारीसह वाळू तस्करांचे कंबरडे मोडण्याचे मोठे आव्हान!
जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी झाली असा दावा कोणी करत असेल तर तो साफ खोटा आहे. गुन्हेगारांवर वचक निर्माण व्हावा अशी ठोस भूमिका आणि कारवाई होण्याची गरज आहे. वाळू तस्करांच्या विरोधात ठोस पावले उचलण्याची गरज असताना महसूल आणि पोलिस विभागातील काही अधिकारी या तस्करांच्या इशाऱ्यावर काम करतात की काय अशी शंका आता येऊ लागली आहे.
आनंद भंडारी थोपवतील का मिनी मंत्रालयातील मनमानी?
राज्यातील अन्य जिल्हा परिषदांच्या तुलनेत नगरच्या जिल्हा परिषदेचा आवाका मोठा आणि येथील लोकप्रतिनिधी देखील जागरुक आहेत. नव्यानेच सीईओ म्हणून येत असलेल्या आनंद भंडारी यांच्यासमोर प्रशासन अधिक गतीमान करण्याचे मोठे आव्हान असणार आहे. याशिवाय काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या एककलमी कार्यक्रमाला ब्रेक लावण्याचे काम देखील त्यांना करावे लागणार आहे. प्रशासक राज असल्याने यापूव येथील काही कामांबाबत अनेक तक्रारी झाल्या. मनमानी पद्धतीने काम करण्याची सवय मोडीत काढण्याचे पहिले पाऊल भंडारी यांना उचलावे लागणार आहे.