अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शहरातील सिध्दार्थनगर भागात कौटुंबिक वादातून एका पुतण्याने आपल्या काकावर कुर्हाडीने हल्ला करत जखमी केल्याची घटना रविवारी (27 एप्रिल) सायंकाळी सातच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी (28 एप्रिल) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल राजाराम गाडे (वय 54) यांनी फिर्याद दिली आहे. राम रंगनाथ गाडे (रा. सिध्दार्थनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.
फिर्यादी विठ्ठल गाडे हे महापालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असून, सिध्दार्थनगर येथे राहतात. रविवारी सायंकाळी सात वाजता ते आपल्या घरी जेवत असताना त्यांचा पुतण्या राम गाडे याने विनाकारण वाद घालत लाकडी दांडका असलेल्या कुर्हाडीने त्यांच्या डाव्या कानावर मारून जखमी केले. या हल्ल्यात विठ्ठल यांना दुखापत झाली असून त्यांनी येथील जिल्हा शासकीय रूग्णालयात उपचार घेतल्यानंतर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिला पोलीस अंमलदार शोभा सोनवणे अधिक तपास करीत आहेत.