अहिल्यानगर । नगर सहयाद्रील:-
माझ्या शेतातील लाकडे का आणली? असा जाब विचारत एका तरुणाला व त्याच्या चुलत्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना नगर शहरातील काटवन खंडोबा परिसरात १३ नोव्हेंबर रोजी रात्री घडली. विशेष म्हणजे, चुलत्याला वाचवण्यासाठी धावलेल्या पुतण्याच्या पाठीवरच धारदार शस्त्राने वार करण्यात आला. याप्रकरणी रोहीत रवी पंडीत (वय २१, रा. संजय नगर, काटवन खंडोबा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संतोष अशोक जाधव, आतुल अशोक जाधव (दोघे रा. टिळक रोड) आणि इतर तीन अनोळखी साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी: फिर्यादी रोहीत पंडीत मित्रासोबत घरी जात असताना काटवन खंडोबाजवळ शेकोटी पेटलेली दिसल्याने ते थांबले. यावेळी संतोष जाधव आले आणि माझ्या मालकीचे लाकूड का आणले? असा राग व्यक्त करत त्यांनी रोहीत पंडीत यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर फिर्यादीच्या चुलत्याला देखल मारहाण केली. चुलत्याला वाचवण्यासाठी धावलेल्या रोहीतवर संतोष जाधव व इतरांनी धारदार शस्त्राने सपासप वार केले. हल्ल्यात फिर्यादी रोहीत पंडित जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. कोतवाली पोलिसांनी पाचही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
आलमगीरमध्ये शाळकरी मुलाला
टोळक्याने केली बेदम मारहाण
शाळेतील भांडणाचा राग धरून आलमगीर परिसरात एका शाळकरी मुलाला पान टपरीच्या उद्घाटनावेळी तब्बल १२ ते १४ जणांच्या टोळक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फैजान व आयान या दोघांसह अन्य १० ते १२ अनोळखी हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या भांडणाचा राग आरोपीच्या मनात होता. १२ नोव्हेंबर रोजी रात्री सव्वादहा वाजताच्या सुमारास पान टपरीच्या उद्घाटनावेळी फैजान आणि आयान आपल्या १० ते १२ अज्ञात साथीदारांसह घटनास्थळी आले. त्यांनी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मुलाला अडवले, शिवीगाळ केली आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. घटना घडल्यावर मुलगा घाबरून घरी गेला आणि घडलेली बाब आईला सांगितली. त्यानंतर आईने तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीसांनी फैजान, आयान आणि त्यांच्या इतर १० ते १२ साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, शाळकरी मुलांमधील वाद गुन्हेगारीपर्यंत पोहोचल्यामुळे स्थानिक प्रशासन आणि पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक इंगळे करीत आहेत.
माळीवाडा परिसरात घरफोडी; सोन्याचे दागिने आणि रोख लंपास
शहरातील गजबजलेल्या माळीवाडा परिसरातील वसंत टॉकीज जवळील ‘गुरु गणेश कॉम्प्लेक्स’मधील एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा तब्बल १ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सदरची घटना गुरुवार (दि. १३) रोजी दुपारी दीड ते रात्री सव्वानऊ वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी घरमालक अंकित अमृतलाल कोठारी (वय ३४, रा. गुरु गणेश कॉम्प्लेक्स) यांनी तात्काळ तक्रार नोंदवली. घरातील सदस्य कामानिमित्त बाहेर गेले होते. हीच संधी साधून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील कपाटातील दोन तोळे वजनाचे दोन पेंडल सेट (एकूण १ लाख रुपये), ८ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन (४० हजार रुपये), ७ ग्रॅम वजनाची दुसरी सोन्याची चैन (३५ हजार रुपये) आणि ५ हजार रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला. फिर्यादी रात्री घरी परतल्यावर घराचे कुलूप उघडे आणि कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त पाहून त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी तात्काळ कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. कोतवाली पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून, अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास पोलिस हवालदार राजेंद्र ओटी करीत आहेत.
टाकळी ढोकेश्वर परिसरात भरदिवसा
पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील खिलारी वस्ती येथे भर दुपारी घरफोडी केल्याची घटना घडली. सुमन शिवाजी खिलारी यांनी याबाबत फिर्याद दिली. त्यांच्या बंगल्याचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी २५ हजार रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा सुमारे १ लाख ४८ हजार रुपये किंमतीची ऐवज लंपास केला. फिर्यादी सुमन खिलारी यांची मुले नोकरीसाठी पुण्यात असून, पती आजारपणामुळे घरी होते. दुपारी १ वाजता फिर्यादी पाणी भरण्यासाठी शेतात गेल्या असता घराला कुलूप लावलेले होते. संध्याकाळी ५ वाजता परतल्यावर घराचे दरवाजे उघडे दिसले आणि कपाटातील सामानाची उचकापाचक झाल्याचे लक्षात आले. घटनेनंतर फिर्यादी खिलारी यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी डॉग स्कॉड बोलावले असता, कुत्र्याने खिलारी यांच्या घरापासून बायपास रस्त्यापर्यंत माग दाखवला. यावरून पोलिसांनी चोरटे वाहनाने पसार झाल्याचा अंदाज व्यक्त केला. भरदिवसा घडलेल्या या घरफोडीने पोलिसांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले आहे. टाकळी ढोकेश्वर परिसरात मोठ्या संख्येने भटके आणि परप्रांतीय कामगार राहतात. त्यांची कोणतीही नोंद पोलिस ठाणे किंवा ग्रामपंचायतीकडे नसल्याने चोरट्यांना फायदा होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ग्रामस्थांनी या सर्वांची ओळखपत्र तपासून चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, परिसरातील असुरक्षिततेबाबत ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.



