निघोज / नगर सह्याद्री
ग्रामीण भागात उद्योग विश्व निर्माण करीत कन्हैया दूध उद्योग समूहाच्या माध्यमातून राज्यातील लाखो कुटुंबांना हक्काचा रोजगार मिळवून देणाऱ्या शांताराम लंके यांचे अनुकरण होण्याची गरज असून युवकांनी लंके यांच्या कार्याचे अनुकरण करीत ग्रामीण भागात उद्योग व्यवसाय यांचे जाळे निर्माण करीत स्वयंपूर्ण होण्याची गरज असल्याने प्रतिपादन राज्याचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री विखे पाटील यांनी कन्हैया दूध उद्योग समूहाचे सर्वेसर्वा शांताराम लंके यांच्या निधनाबद्दल दुख व्यक्त करीत सोमवार दि.१३ रोजी सायंकाळी कै. लंके यांचे बंधू जी एस महानगर बॅंकेचे संचालक बबनशेठ लंके, कन्हैया दूध उद्योग समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मच्छिंद्रशेठ लंके व त्यांच्या कुटुंबीयांना भेटून त्यांचे सांत्वन केले.
यावेळी आमदार काशिनाथ दाते, भाजपचे राज्य कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, उद्योजक सुरेशशेठ पठारे, संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, तसेच तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नामदार विखे पाटील यावेळी म्हणाले गेली काही वर्षात कै. लंके यांना भेटण्याचा योग मला अनेक वेळा आला. त्या त्या वेळी पारनेर तालुक्यातील समस्या, उद्योग विश्व, शेतकऱ्यांचे प्रश्न, निघोज व परिसरातील विकासकामे याची चर्चा करीत त्यांनी जनविकासाचे प्रश्न मांडीत पाठपुरावा केला. निघोज आणी परिसरातील संस्था, सामाजिक संस्था यांना संजीवनी देणारे नेतृत्व आपल्यातून हरपले. त्यांच्या जाण्याने या भागातील एक ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला आहे. सातत्याने शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ देणारे नेतृत्व म्हणून शांताराम बापूंचे नाव राज्यात प्रचलित होते. कन्हैया दूध उद्योग समूहाची उभारणी करताना त्यांनी सर्वसामान्य जनता व शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून काम केले म्हणून जनतेची दुवा खऱ्या अर्थाने त्यांना मिळाली यातून कन्हैया दूध उद्योग समूहाचा नावलौकिक सातासमुद्रापार झाला.
ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील एखाद्या व्यक्तीने दूध उद्योगांमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी होणे ही अभिमानाची बाब असून तो लौकिक शांताराम लंके यांनी राज्यात मिळवीला आहे. तसेच या उद्योग समूहाची जबाबदारी मच्छिंद्र शेठ लंके यांच्यावर देत त्यांना सुद्धा यशस्वी करण्याचे काम लंके यांनी केले आहे. कै. लंके यांनी या उद्योगाबरोबरच विविध संस्थांमध्ये पदाधिकारी म्हणून मार्गदर्शन करताना गावगाडा भक्कमपणे चालवला आहे. सामाजिक क्षेत्रात त्यांचे काम मोठे आहे. सामाजिक, धार्मिक क्षेत्रात त्यांचा वारसा यशस्वीपणे पार पाडण्याची जबाबदारी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची आहे. जेणेकरून कै. लंके यांच्या कामाची आठवण सातत्याने समाजाला येऊन त्या माध्यमातून समाजविकासाची कामे होतील. कै. लंके यांचे कार्य जिल्ह्यातील जनतेला प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन नामदार विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. यावेळी नामदार विखे पाटील यांनी कै. शांताराम लंके यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व श्रद्धांजली अर्पण केली.