श्रीगोंदा । नगर सहयाद्री:-
श्रीगोंदा नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता रंग चढला आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीबाबत चाललेल्या चर्चांना आज राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)ने पूर्णविराम दिला. माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान उपनगराध्यक्षा ज्योती सुधीर खेडकर यांची नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. या घोषणेमुळे श्रीगोंद्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
नगराध्यक्ष पदाची उमेदवारी जाहीर करणारा राष्ट्रवादी काँग्रेस हा पहिला पक्ष ठरला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार, राजेंद्र नागवडे, राहुल जगताप, अण्णासाहेब शेलार, बाळासाहेब नहाटा यांच्या प्रमुख उपस्थिती पत्रकार परिषदेत आयोजित केली होती. याप्रसंगी उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळीशेलार यांनी सांगितले की, अजितदादांच्या व्हिजननुसार श्रीगोंद्यात बारामती पॅटर्न राबवण्यासाठी ज्योतीताईंच्या नेतृत्वात राष्ट्रवादी सज्ज आहे. भाजपला उमेदवार आयात करावे लागतात, हीच का त्यांची कर्तबगारी? असा अप्रत्यक्ष टोला आमदार विक्रम पाचपुते यांच्यावर लगावला.
राजेंद्र नागवडे यांनी मनोहर पोटे यांच्या उमेदवारीबाबत स्पष्टीकरण दिले. मनोहर पोटे यांच्या नावावर आम्ही चर्चा केली नव्हती, ती चर्चा फक्त बाहेर रंगवली गेली, असे ते म्हणाले. तसेच, बाबासाहेब बोस यांना पक्षात घेण्याबाबत चर्चा झाली पण काही मुद्द्यांवर एकमत न झाल्याने तो विषय पुढे गेला नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राहुल जगताप यांनीही भाजपवर निशाणा साधला. श्रीगोंदाची बारामती करणार, श्रीगोंद्यात विकासाचा नवा पॅटर्न दाखवणार, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकीकडे राष्ट्रवादीत उमेदवारी ठरवताना आतून झालेल्या धक्का तंत्रा ने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. अनेकांना खात्री होती की मनोहर पोटे किंवा त्यांच्या पत्नी शुभांगी पोटे राष्ट्रवादीच्या उमेदवार असतील. मात्र, अखेर क्षणी ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ज्योती खेडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत राष्ट्रवादीने राजकीय समीकरणच बदलून टाकले.
पक्षाच्या सूत्रांनुसार, सर्व २२ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीने लढणार असून उमेदवारांची निवड प्रभागातील मतदारसंघाच्या मिरीटनुसार केली जाणार आहे. ज्योती खेडकर यांनी श्रीगोंद्यात बारामती विकास पॅटर्न आणायचा आहे, तसेच शहरातील वीज ,पाणी, रस्ते, आरोग्य सर्व विकास कामे मार्गी लावण्यासाठी सर्व बावीस नगरसेवक निवडून आणण्याचा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास असल्याचे सांगीतले.
निवडणुकीचा सूर बदलला!
राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारीच्या शर्यतीत पहिले पाऊल टाकत निवडणुकीचा सूरच बदलला आहे. अजित पवार गटाकडून ज्योती खेडकर यांची निवड ही फक्त राजकीय निर्णय नाही, तर ओबीसी समाजाचा संतुलन साधणारा एक रणनीतिक डाव मानला जात आहे. या घोषणेमुळे श्रीगोंद्यातील राजकारणाला नवे समीकरण लाभले असून, आता सर्वांची नजर भाजप आणि काँग्रेसच्या पुढील पावलांवर आहे.



