अहमदनगर | नगर सह्याद्री;-
महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत दिल्लीत प्राथमिक चर्चा झाली आहे. येत्या ७-८ दिवसांत यासंदर्भात पावले उचलावी लागतील, सरकारमध्ये सहभागी होताना त्यावेळीही प्राथमिक चर्चा झालीच होती. दिल्लीतील चर्चेतच विस्तारावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार याबाबत चर्चा होईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे यांनी सांगितले. २०१९ मध्ये ज्या जागांवर राष्ट्रवादीचा विजय झाला, तेवढ्या जागा आम्ही मागणारच, असाही दावा त्यांनी केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांनी राज्याच्या दौर्यास नगरमधून मंगळवारपासून सुरुवात केली. नगरमधील आढावा बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सूतोवाच केले. महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर, आ. संग्राम जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आगामी विधानसभा निवडणूक महायुती एकत्रितच लागणार आहे, मात्र काही जण विशेषतः विरोधक अपयशाचे खापर अजितदादांच्या माथी कसे फोडता येईल, महायुतीमध्ये मिठाचा खडा कसा टाकता येईल, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या नेतृत्वाला कमीपणा कसा येईल, यासाठी प्रयत्न करत आहेत, असाही दावा तटकरे खा. तटकरे यांनी केला.
विधान परिषदेच्या जागा जरी एकमेकांच्या विरोधात लढत असलो तरी विधानसभेसाठी तसे होणार नाही, शिक्षक मतदारसंघासाठी पूर्व चर्चा होऊनच जागा लढवल्या जात आहेत. महायुतीचा ४०० पारचा नारा हा कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी होता, असा दावा खा.तटकरे यांनी केला. या आत्मविश्वासामुळेच अल्पसंख्यांक व राज्य घटनेबद्दल संशयाचे वातावरण तयार झाले का, या प्रश्नावर बोलताना त्यांनी आशावाद निर्माण करणे चुकीचे नाही असे समर्थन केले.
रोहित पवारांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाईप्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी आ. रोहित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. राष्ट्रवादीचा कोणीही आमदार त्यांच्या संपर्कात नाही, केवळ दिशाभूल केली जात आहे. रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष तटकरे म्हणाले की, रोहित पवार यांना प्रदेशाध्यक्ष होण्याची घाई झाली आहे. त्यांना स्वतःच्या स्थानाची काळजी वाटते, परंतु पक्षात काही बोलता येत नसल्याने ते लक्ष वेधून घेत आहेत.