अमृतवाहिनीत ‘अमृतरास’ गरबा उत्साहात | 2500 विद्यार्थिनींचा उत्स्फूर्त सहभाग
संगमनेर । नगर सहयाद्री:-
शक्ती आणि भक्तीचा संगम म्हणजेच नवरात्र महोत्सव असून, हा उत्सव महिलांच्या आनंदाचे खरे पर्व आहे. शिक्षणाबरोबरच भारतीय संस्कृती आणि सण-परंपरा जपणे ही नव्या पिढीची जबाबदारी आहे, असे प्रतिपादन डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले. आजच्या स्पर्धेच्या युगात केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे, तर विशेष कौशल्ये व परिपूर्ण व्यक्तिमत्व विकास आवश्यक आहे. याकरता अशा सांस्कृतिक उपक्रमांची गरज असून, त्यातून विद्याथ आयुष्यात अधिक समृद्ध व सशक्त बनतात असे मत त्यांनी व्यक्त केले.
गुणवत्तेतून देशात लौकिक मिळवणाऱ्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेत शारदीय नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने अन्नपूर्णा मेस व एकविरा फाउंडेशनच्या वतीने ‘अमृतरास गरबा नाईट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात सुमारे 2500 विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेऊन दांडिया खेळण्याचा आनंद लुटला. यावेळी डॉ. जयश्रीताई थोरात बोलत होत्या.
यावेळी डॉ. मैथिलीताई तांबे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. एम.ए.व्यंकटेश, अन्नपूर्णा मेसचे मधुसूदन दायमा यांच्यासह विभाग प्रमुख शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयूताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता अमृतवाहिनी संस्थेच्या वतीने सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने वसंत दादा क्रीडा संकुलात भव्य गरबा दांडिया कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मेट्रो सिटीत होणाऱ्या लाईव्ह कॉन्सर्ट प्रमाणे अत्यंत अद्यावत सुविधांमध्ये झालेल्या या दांडिया महोत्सवात भव्य दिव्य व्यासपीठ, एलईडी स्क्रीन, डीजे, पारंपारिक पोषकामध्ये सहभागी झालेल्या सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी यामुळे हा कार्यक्रम संस्मरणीय झाला. यावेळी डॉ. मैथिलीताई तांबे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य डॉ. व्यंकटेश यांनी विद्यार्थिनींना शुभेच्छा दिल्या.