सुपा । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यात सोमवार दि. १९ रोजी दुपारी १ ते ३ दरम्यान झालेल्या मुसळधार वादळी वार्यासह पावसाने खरीप हंगामातील पिके भुईसपाट झाले असून शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे, यात शेतकर्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.
पारनेर तालुक्यात सध्या खरीप हंगामातील मुग तोडणीचे कामे सुरू आहेत, तर बाजरी हुरड्यात आहे, चालू वर्षी शेतकर्यांनी मका, सोयाबीन, कांदा पीकाची मोठ्या प्रमाणात पेरणी केली आहे. रविवारी तालुक्यात पावसाने हजेरी लावली मात्र सोमवारी दुपारी झालेल्या वादळी वार्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. यात शेतकर्यांच्या मुगाचे व शेतात डोलत असलेल्या बाजरी पिक अक्षरशः जमीनीवर लोळू लागल्याने शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले. तर पाऊस पडत असताना वादळी वार्यात मोठ मोठी झाडेही उन्मळून पडली. चालू वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. रोहिणी नक्षत्र पडल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवित झाल्या.
बाजारातून महागडे बी बियाणे खरेदी करून शेतकर्यांची पेरणीसाठी लगबग सुरू झाली. पावसाने उघडीप दिल्यानंतर वापसा होताच खरीप हंगामातील मुग, बाजरी, वाटाणा, तुर, कांदा व जनावरांच्या चार्यासाठी मका, कडवळ, घास आदींची पेरणी केली. त्याची उगवणही चांगल्या प्रकारे झाली. मात्र चालू वर्षी सततच्या पावसामुळे मुगाचे पिक नसतेच वाढले मात्र त्यास शेंगा कमी प्रमाणात लागल्या काही ठिकाणी तर अधिक पावसाने शेतकर्यांचे प्लॉटची प्लॉट पिवळे पडल्याने उभे पीक वाया गेले.
कमी कष्टात व नगदी पीक म्हणून समजले जाणारे मुगाचे पीक वाया गेल्याने आम्ही जगायचे तरी कसे असा प्रश्न शेतकर्यांपुढे उभा ठाकला आहे. दरम्यान सोमवारी दुपारी झालेल्या पावसाने खरीप हंगामातील पिके भुईसपाट झाल्याने शेतकर्यांचे मुग, बाजरी, मका, कडवळ, कांदा पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून शासनाने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकर्यांमधून केली जात आहे.