मुंबई । नगर सहयाद्री:-
विधानसभेचे बिगुल वाजणार असून सर्वच पक्षानीनिवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये जागा वाटपावरुन रस्सीखेच सुरू आहे. विधानसभेच्या जागांसाठी शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी जागा वाटपाबाबत सर्वात महत्वाचे विधान केले आहे.
विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जवळपास ६० जागा मिळतील, असे सर्वात महत्वाचे विधान अजित पवार यांनी केले आहे. युवक राष्ट्रवादीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवार यांनी आपण ६० एक जागा लढवणार असल्याचे म्हटले आहे.
अजित पवार नेमकं काय म्हणाले?
आपल्याला तीन वेगवेगळ्या पद्धतीने काम करायचे आहे. तुम्हाला आम्ही तशी यादी देऊ. तुम्ही अजितबात गाफील राहू नका. आपल्याला न मिळणाऱ्या जागेवर शक्ती खर्च करु नका. संवाद साधताना आपलेपणाने बोला. शांतपणाने, डोक्यावर बर्फ ठेऊन संवाद साधा. उगाच बाहेर काढा रे त्याला, असं करु नका. बाहेर काढा म्हणल्यावर आपल्यालाच बाहेर जावं लागेल. कृपा करुन काम करा, दुर्लक्ष करु नका,” असे अजित पवार यावेळी म्हणाले.