बुधवारी राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा
अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लवकर होतील. यासाठी आपल्याला जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढवायची आहे. महायुती म्हणून एकत्रित निवडणुका लढवल्या जातील किंवा नाही, हे आता आपल्याला सांगता येणार नाही. मात्र प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे, अशा शब्दात आमदार काशीनाथ दाते यांनी कार्यकर्त्यांना स्वबळाच्या तयारीला लागण्याचे संकेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात स्वाभिमान मंगल कलश यात्रेला सुरूवात झाली. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव येथे शुभारंभ झाला आहे. ३० एप्रिल रोजी शिर्डी येथे आगमन होणार असून याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नियोजनाची बैठक जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार काशिनाथ दाते यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर, प्रा. माणिक विधाते, अण्णासाहेब शेलार, प्रशांत गायकवाड, संजय कोळगे, क्षितिज घुले, संतोष धुमाळ, सुरेश बनसोडे, दत्तात्रेय पानसरे, आशाताई निंबाळकर, जिल्हा सचिव सचिन डेरे, अकुंश गर्जे, साईनाथ भगत व जिल्ह्यातील सर्व संघाचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते.
आ. दाते म्हणाले की, राज्यात महायुतीचे सरकार असून शासनाच्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाण्याचे काम केले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण काम करत आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत.जिल्ह्यात पक्षवाढीचे काम आपल्या सर्वांना करावे लागणार आहे. त्यासाठी मतभेद बाजुला ठेवा, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्ष अशोक सावंत म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र स्वाभिमान मंगल कलश यात्रा 30 एप्रिल रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी येथे आगमन होणार आहे. या ठिकाणी प्रवरा व गोदावरी नदीतील पाणी कलश मध्ये टाकले जाणार असून, श्री शनिशिंगणापूर येथील माती कलशामध्ये टाकली जाणार आहे. आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयाजवळ कलश यात्रेचे स्वागत जिल्ह्याच्या वतीने करण्यात येणार आहे. त्यानंतर कलश यात्रा पारनेरकडे रवाना होणार असून, पारनेर येथे रथयात्रेचा समारोप होणार आहे.
शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमान कलश रथयात्रा सुरू झाली असून, नगर जिल्ह्यात येणार आहे. माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्यावर पुणे येथे खाजगी हॉस्पिटल येथे उपचार सुरू असल्यामुळे वाजत गाजत रथयात्रेचे स्वागत केले जाणार नाही, मात्र आमदार संग्राम जगताप यांच्या कार्यालयात जवळ नगर शहरातील पदाधिकारी कार्यकर्ते स्वागत करतील असे ते म्हणाले. यावेळी अनेक पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
बुधवारी राष्ट्रवादीची मंगल कलश यात्रा
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान मंगल कलश यात्रेचे बुधवार (दि. ३०) रोजी पारनेर शहरातील हॉटेल ऋषीकेश येथे सायंकाळी ४ वाजता अगमन होणार आहे. कार्यक्रमाला महाराष्ट्राचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ आणि माजी मंत्री, आमदार अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थित लाभणार आहे. आमदार काशिनाथ दाते यांनी नागरिकांना या ऐतिहासिक रथ यात्रेच्या स्वागतासाठी आणि सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.