दुचाकी, दुकारनांची तोडफोड | जखमींवर रुग्णालयात उपचार
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात चोऱ्या, मारामाऱ्या, दरोड्याची गुन्हे वाढले आहेत. त्यातच आता पोलिसांचा धाक राहिलाच नसल्याचे वास्तव दिल्लीगेट परिसरात घडलेल्या घडणेवरुन समोर येत आहे. अक्षरशः पोलिसांच्या नाकावर टिच्चून दिल्लीगेट परिसरात भर दिवसा हातात दांडके घेऊन दोन गटात राडा झाला. हा गंभीर प्रकार भर दिवसा घडल्याने शहरात पोलिसांचा धाक राहिलाय की नाही असाच सवाल अहिल्यानगर वासियांकडून उपस्थित केला जात आहे.
दिल्लीगेट परिसरातील मेहतर कॉलनी येथे गुरुवारी (24 जुलै 2025) दुपारी जुन्या वादातून पवार आणि चव्हाण कुटुंबियांमध्ये तुफान राडा झाला. या हाणामारीत लाकडी दांडके आणि दगडफेकीचा वापर झाला, तसेच दुचाकी आणि दुकानांची तोडफोड झाली. तोफखाना पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.
प्रत्यक्षदशनुसार, दिल्लीगेट ते नेप्ती रोडवर दोन्ही गट आमनेसामने आले, त्यानंतर मारहाण आणि तोडफोड सुरू झाली. यात अनेक जण जखमी झाले. जखमींना प्रथम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर काहींना खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती मिळताच तोफखाना पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि शांततेचे आवाहन केले. एक गट थेट जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात पोहोचला, ज्यामुळे खळबळ उडाली.
पोलीस अधीक्षकांनी जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले आणि पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या. दोन्ही गटातील व्यक्ती वेगवेगळ्या रुग्णालयांत उपचार घेत असल्याने, गुरुवारी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता. मात्र, दोन्ही गटांचे जबाब घेऊन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. मारहाण झाल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. यावरुन नगर शहरात पोलिसांचा धाक संपलाय का असा सवाल यानिमित्ताने नगरकर उपस्थित करत आहेत.
पोलिसांचा धाक संपला? एसपींच्या भूमिकेकडे लागले नगरकरांचे लक्ष
दिल्लीगेट परिसरात भर दिवसा दोन गटात तुफान राडा झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. हा भयानक व्हिडिओ पाहून नगरवासियांचा भरकाप उडाला आहे. भर दुपारी टोळक्याने दांडके हातात घेऊन हल्ला केल्याने शहरात खाकीचा धाक पूर्णपणे संपलाय असाच काहीसा सवाल अहिल्यानगर वासिय उपस्थित करत आहेत. दिल्लीगेट राड्यामुळे सामान्य नागरिकही भयभीत झाला असून चमकोगिरी करण्यात माहिर असलेली पोलिस यंत्रणा गुन्हेगारी रोखण्यात मात्र सपशेल अपयशी ठरले आहेत.