अहिल्यानगर | नगर सह्याद्री:-
शहरात लवकरच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाला साजेसे असे संविधान भवन उभारले जाईल यासाठी जिल्हा नियोजन समिती निधीतून 5 व राज्य शासनाकडून 10 कोटी असा एकूण 15 कोटी रुपयांचा निधी दिला जाईल आमदार संग्राम जगताप यांनी शहर विकासासाठी मागितलेला निधी कमी पडू दिला नाही असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी केले.
नगर शहरातील मार्केट यार्ड चौक परिसरात महापालिकेच्या माध्यमातून साकारलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, काशिनाथ दाते, माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील, माजी आमदार लहू कानडे, जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, आयुक्त यशवंत डांगे, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संपत बारस्कर, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, भन्ते राहुल बोधी मा. आयुक्त डॉक्टर पंकज जावळे, कृती समितीचे अध्यक्ष सुरेश बनसोडे, अशोक गायकवाड, अजय साळवे, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, भाजपचे युवा नेते अक्षय कर्डिले, धनंजय जाधव, मनेष साठे, निखिल वारे, सुनील त्रिंबके, आदींसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, देशाला एकता, समता आणि बंधुतेच्या नात्याने बांधण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांमध्ये आहे. शिक्षण, समता व बंधुता ही बाबासाहेबांची त्रिसूत्री आपल्या मनात कायम जागी ठेवणारे हे स्मारक प्रेरणा देणारे ठरेल देशाचे संविधान बदलले जाईल अशा अफवा पसरवल्या जात आहे, मात्र जोपर्यंत या पृथ्वीवर चंद्रसूर्य अस्तित्वात आहेत तोपर्यंत भारताचे संविधान कधीही बदलले जाणार नाही, असे ते म्हणालेसुरेश बनसोडे म्हणाले की, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा शहरात उभारावा यासाठी समाजाने मोठा लढा उभा केला.
आंदोलने, पत्र व्यवहार केले आमदार संग्राम जगताप यांच्या पाठपुराव्यामुळेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य असा पूर्णाकृती पुतळा उभा राहिला आहे असे ते म्हणाले. शहरात महापालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विकास कामाचे सादरीकरण आयुक्त यशवंत डांगे यांनी प्रास्ताविकात केले. यावेळी अशोक गायकवाड, अजय साळवे, नाथाभाऊ आल्हाट, सुमेध गायकवाड, जल अभियंता परिमल निकम, भन्ते राहुल बोधी यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव काळापाड यांनी केले तर आभार प्रदर्शन उपायुक्त विजयकुमार मुंडे यांनी मानले.