अहमदनगर | नगर सह्याद्री:-
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकिंग परवाना रद्द केल्यानंतर अवसायनात निघालेल्या नगर अर्बन को ऑपरेटिव्ह बँकेच्या पात्र १७ हजार ४२४ ठेवीदारांना ६३ कोटी रुपये परत करण्याच्या तिसर्या टप्प्यातील प्रस्तावास डीआयसीजीसी ने मान्यता दिली आहे. ही रक्कम लवकरच केवायसी कागदपत्रांची पूर्तता व लेम फॉर्म भरून दिलेल्या पात्र ठेवीदारांच्या खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अवसायक तथा एनसीडीसीचे संचालक गणेश गायकवाड यांनी दिली.
दहा महिन्यांपूर्वी बँकेच्या अवसायक पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर श्री गायकवाड यांनी बँकेच्या दैनंदिन खर्चात कपात करण्याच्या दृष्टीने भाडेतत्त्वावर कार्यालय असलेल्या १८ शाखा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्याच्या दृष्टीने डीआयसीजीसीकडे सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे आतापर्यंत ५ लाखांच्या आतील पात्र ठेवीदारांचे मार्च २०२२ मध्ये पहील्या लेमचे १८१.७१ कोटी, जून २०२२ मध्ये दुसर्या लेमचे ११३.१४ कोटी असे एकूण २९४.८५ कोटी ठेवी परत केल्या आहेत.
त्याचबरोबर थकीत कर्ज वसुलीसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना सुरू केली. गेल्या दहा महिन्यांच्या कालावधीमध्ये थकीत कर्जापैकी रु ४०.३२ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली आहे.उर्वरित थकीत कर्ज वसुलीसाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू असून त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे पोलिस प्रशासन व न्यायालयात उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
थकीत कर्जदारांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी आपल्या थकीत कर्जाची रक्कम लवकरात लवकर भरून बँक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन अवसायक गणेश गायकवाड यांनी केले आहे. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत करण्यात बँक प्रशासन कटिबद्ध असून ज्या ठेविदारांनी अद्याप आपले केवायसी कागदपत्रे व लेम फॉर्म भरून दिलेले नाहीत त्यांनी तात्काळ नजीकच्या शाखेत ते जमा करावेत असे आवाहन श्री गायकवाड यांनी केले आहे.