अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
नगर अर्बन बँकेतील कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी माजी संचालक अजय अमृतलाल बोरा यांचा अटकपूर्व जामीन अर्ज येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. एच. शेख यांनी नामंजूर केला आहे. येथील नगर अर्बन बँकेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. पोलीस ठाण्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. सुरूवातीला पोलीस ठाणे स्तरावर तपास करण्यात आला. आता आर्थिक गुन्हे शाखेकडून या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. अटकपूर्व जामिनासाठी माजी संचालक अजय बोरा यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केलेला होता.
त्या अर्जाला विरोध करताना फिर्यादी राजेंद्र गांधी यांच्यावतीने अॅड. अभिजीत पुप्पाल यांनी युक्तीवाद केला. बँकेचा गुन्हा अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे, या अगोदर ज्या संचालकांचा यामध्ये समावेश होता व त्यांनी न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला होता त्यांचे जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केले आहेत. अजय बोरा हे सुध्दा बँकेचे माजी संचालक आहेत. विशेष म्हणजे 291 कोटी रुपयांच्या घोटाळ्या संदर्भामध्ये ज्या पध्दतीने बँकेच्या संचालक मंडळाने गांभीर्याने या बाबी लक्षात घेऊन वसुली करणे गरजेचे होते ती वसुली केली नाही, म्हणून त्यांच्यावर लेखा परीक्षणामध्ये ताशेरे ओढण्यात आलेले होते.
यामध्ये अजय बोरा हे बँकेच्या ऑडिट रिकव्हरी या कमिटीमध्ये सदस्य म्हणून कार्यरत होते. त्यांनी सुध्दा या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नाही. तसेच त्यांनी कोणत्याही प्रकारचा विरोध केला नाही, त्यामुळे ही बाब अतिशय गंभीर आहे, असा युक्तीवाद केला. बोरा यांच्यावतीने वकिलांनी युक्तीवाद केला. न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर अजय बोरा यांचा जामीन अर्ज नामंजूर केला आहे.