लंकेंच्या पराभवामुळे तालुक्यातील पुढार्यांनी साधली आमदार कर्डिलेंशी जवळीक
सुनील चोभे | नगर सह्याद्री
पंधरा वर्षापूर्वी आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध म्हणून तालुक्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येत नगर तालुका महाविकास आघाडी स्थापन केली. परंतु तीच नगर तालुका महाविकास आघाडी आता अखेरच्या घटका मोजत आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आली. तसेच शिवाजी कर्डिले पुन्हा आमदार झाले. त्यातून तालुक्यातील कर्डिलेंची ताकद वाढल्याने विरोधकांची ताकद नाममात्र राहिली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या अनुषंगाने नगर तालुका महाविकास आघाडीतील अनेकांनी आमदार कर्डिलेंशी जवळीक साधल्याचे बोलले जात आहे.
नगर तालुक्यात माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांची मोठी ताकद होती. परंतु, शिवाजी कर्डिले यांनी शेळकेे यांच्या वर्चस्वाला सुरुंग लावला. दरम्यानच्या काळात कर्डिले यांना रोखण्यासाठी कर्डिले विरोधकांनी नगर तालुका महाविकास आघाडी स्थापन केली. त्याचे नेतृत्व स्व. दादा पाटील शेळके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी केले. बाळासाहेब हराळ, संदेश कार्ले, रामदास भोर, शरद झोडगे, प्रताप पाटील शेळके, संपतराव म्हस्के, बाबासाहेब गुंजाळ यांच्यासह अनेकांनी शेळके-गाडे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीला साथ दिली.
कर्डिलेंना रोखण्यात महाविकास आघाडीला यश मिळाले. परंतु, सध्या केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि कर्डिले पुन्हा आमदार झाल्याने तालुक्यात भाजपाची ताकद वाढली. त्यामुळे महाविकास आघाडी अस्वस्थ झाली आहे. आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने नगर तालुका महाविकास आघाडीतील अनेकांनी आमदार कर्डिलेंशी जवळीक साधल्याची माहिती आहे.
दादा पाटलांचे नातू कर्डिलेंच्या गोटात
नगर तालुक्यातील भाजाचे नेते आमदार शिवाजी कर्डिले यांना विरोध म्हणून पंधरा-सोळा वर्षांपूर्वी सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्रित येत नगर तालुका महाविकास आघाडी स्थापन केली. याच महाविकास आघाडीच्या माध्यमातून जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समितीच्या निवडणुका लढल्या. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला मोठे यश मिळाले. बाजार समिती निवडणुकीतही महाविकास आघाडीने नशीब आजमावले. परंतु, त्या निवडणुकीत अपयश आले. त्यानंतर नगर तालुका विकास आघाडीचे प्रणेत माजी खासदार स्व. दादा पाटील शेळके यांचे चिरंजीव रावसाहेब पाटील शेळके व नातू अंकूश शेळके यांनी आमदार शिवाजी कर्डिले यांच्याशी घरोबा करत भाजपमध्ये प्रवेश केला.
कार्ले अस्वस्थ, पदाधिकारी शिंदे सेनेच्या संपर्कात….
नुकत्याच झालेेल्या विधानसभा निवडणुकीत पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघातून ठाकरे सेनेकडून शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. परंतु या मतदारसंघातील जागा शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीला गेली. अन्याय झाल्याने कार्ले यांनी अपक्ष विधानसभा निवडणूक लढविली. त्याचा फटका महाविकास आघाडीच्या उमेदवार राणी लंके यांना बसला. कार्ले यांच्या उमेदवारीमुळे लंके यांना पराभवाला सामोरे लावे लागले. दरम्यान, कार्ले यांनी एका मुलाखतील शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांवर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे शिवसेनेत जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे. नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य शरद झोडगे, संदेश कार्ले, माजी सभापती रामदास भोर, गोविंद मोकाटे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असून त्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती आहे.
आमदारकीमुळे कर्डिले समर्थकांची ताकद वाढली
गेल्या पंधरा वर्षांपासून नगर तालुक्यात भाजपा नेते शिवाजी कर्डिले यांच्या विरोधात नगर तालुका महाविकास आघाडीने टोकाचा संघर्ष केला. बाजार समितीमध्ये सलग तीनदा कडिलेंनी एकहाती सत्ता मिळविली. तर पंचायत समितीमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिले. गत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये कर्डिलेंचे सर्वच उमेदवार पराभूत झाले. परंतु नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवाजी कर्डिले यांनी राहुरी-नगर विधानसभा मतदारसंघातून मंत्री प्राजक्त तनपुरे यांचा मोठ्या मताधिक्क्याने पराभव केला. केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने आणि कर्डिले पुन्हा आमदार झाल्याने तालुक्यातील भाजपाची ताकद वाढली आहे.