अहमदनगर । नगर सहयाद्री-
जिल्ह्यातील नगर- मनमाड महामार्गावरील राहुरी विद्यापिठ परिसरात भरधाव डंपरने तरुणाला चिरडल्याची घटना घडली आहे. या भीषण अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. सुरेश सुभाष साळुंके, ( रा. नालेगाव, अहमदनगर ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
अधिक माहिती अशी: राहुरी तालुक्यातील महसूल व पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने वाळू व गौण खनिजाची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. ९ जून रोजी सकाळी ११.४५ वाजे दरम्यान (एमएच १६ सी सी ७३२६) कचखडीने भरलेल्या डंपरने महात्मा फुले कृषी विद्यापीठ परिसरात डाव्या कालव्याजवळ फार्म कॉर्टर समोर नगर- मनमाड राज्य महामार्गावर दुचाकी ( क्र. एम. एच. १६ सी. पी. ३१८० ) या मोटारसायकलला पाठीमागून जोराची धडक दिली.
या अपघातात दुचाकीस्वार सुरेश सुभाष साळुंके, रा. नालेगाव, नगर, हा तरुण डंपरच्या चाकाखाली चिरडल्याने तो जागीच ठार झाला. त्यावेळी डंपर चालक डंपर घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आणि एका ठिकाणी कचखडी खाली करून पसार होण्याचा प्रयत्न करत होता.मात्र माहिती मिळताच काही स्थानिक नागरिकांनी सदर डंपर पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला असून पुढील तपास पोलीस करत आहे.