अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
नगर–मनमाड महामार्गावर कोपरगावजवळील भास्कर वस्ती येथे शुक्रवारी (14 नोव्हेंबर) रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघाताने परिसर दणाणून गेला. लक्झरी बस आणि क्रेटा कारची समोरासमोर झालेली प्रचंड धडक इतकी घातक ठरली की कारला जागीच आग लागून चालकाचा होरपळून मृत्यू झाला. काही क्षणांत कार राखरंग झाली.
कोपरगाव–येवला मार्गावरून जाणारी लक्झरी बस (क्र. एएस 01 क्यूसी 3516) भास्कर वस्ती येथे पोहोचताच येवल्याकडून येणाऱ्या क्रेटा कारशी जोरदार धडकली. या भीषण धडकेनंतर कारने तात्काळ पेट घेतला. कार चालक विंचूर येथील असल्याची प्राथमिक माहिती आहे.
स्थानिक नागरिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळवले. कोपरगाव नगरपालिका आणि येवला नगरपरिषद अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहिले.
अपघातानंतर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. दरम्यान, स्थानिकांनी प्रसंगावधान दाखवत बसमधील प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक रामकृष्ण कुंभार पथकासह घटनास्थळी दाखल होऊन वाहतूक सुरळीत करण्याचे व पंचनामा करण्याचे काम सुरू केले. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.



