पाथर्डी, जामखेड, नगर, श्रीगोंदा, कर्जतमध्ये तुफान पाऊस
अहिल्यानगर | नगर सह्याद्री
गेल्या आठ दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. रविवारी दिवसभर व रात्री दक्षिण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. त्यामुळे नद्यांना पूर आले असून पिके पाण्यात गेली आहेत. दरम्यान भारतीय हवामान खात्याने पुन्हो अहिल्यानगर जिल्ह्याला यलो अलर्ट जाहीर केला आहे. रविवारी जिल्ह्यात 33.5 मिलीमिटर पाऊस झाला.
अहिल्यानगर जिल्ह्यात सरासरी 100 टक्के पाऊस झाला आहे. तरीही गेल्या वषपेक्षा यंदाचा पाऊस कमीच आहे. गेल्या आठ- दहा दिवसांपासून जिल्ह्यात कुठे ना कुठे धुमाकूळ घालत आहे. गत आठवड्यात पाथडत, श्रीगोंदा, पारनेरमध्ये तुफान पाऊस झाला होता. रविवारीही दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली. त्यात नगर, पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, शेवगाव, पाथडत, नेवासामध्ये पावसाने दमदार हजेरी लावली. दमदार झालेल्या पावसामुळे नगर तालुक्यातील कापूरवाडी तलाव ओव्हरफ्लो झाला आहे. नद्यांना पूर आले आहेत. वालूंबा नदीला आलेल्या पूरामुळे वाळकीच्या पुलावरुन पाणी चालले आहे. तर खडकी-सारोळा कासारचा संपर्क काही काळ तुटला होता.
24 मंडळात अतिवृष्टी
रविवारी दक्षिण जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. कापुरवाडी 71.5, केडगाव 74, भिंगार 72.3, चिचोंडी 72, चास 74, मांडवगण 70.8, कोळगाव 73.8, मिरजगाव 78.8, जामखेड 69, खर्डा 74.8, नानज 69, नायगाव 79.3, साकत 79.3, बोधेगाव 81.8, चापडगाव 81.8, मुंगी 81.8, पाथड 124.8, मिरीमाका 124.8, टाकळी 155.8, कोरडगाव 124.8, करंजी 69.5, तिसगाव 69.5, खरवंडी 155.8, अकोला 124.8 मिलीमिटर पाऊस झाला.
पाच दिवस पाऊस
अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सतत पाऊस होत आहे. तसेच भारतीय हवामान खात्याने पुन्हा मुसळधार पाऊसाचा इशारा दिला आहे. तर 23 व 24 रोजी वादळी वाऱ्यासह वीजांसह दमदार पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. तर 25 व 26 रोजी मध्यम स्वरुपाचा पाऊस होणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, जिल्ह्यात होत असलेल्या सततच्या पावसामुळे नद्यांना पूर आले असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे.
गुंडेगाव परिसरात अतिपावसामुळे पिकांचे मोठे नुकसान
अहिल्यानगर तालुक्यातील गुंडेगाव व परिसरात गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या जोरदार पावसामुळे नद्या, ओढे, नाले ओसंडून वाहत असून शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडला आहे. या अतिवृष्टीमुळे शेकडो हेक्टरवरील शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, 358 हेक्टर कांदा, 364 हेक्टर तुर, 150 हेक्टर कापूस, 27 हेक्टर सोयाबीन तसेच बाजरी, मका यांसारख्या पिकांवर पावसामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. शेतकऱ्यांनी हंगामभर खर्च करून घेतलेली पिके काही तासांच्या पावसामुळे पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे.या गंभीर परिस्थितीची दखल घेत माजी उपसरपंच संतोष भापकर यांनी तातडीने तहसीलदारांकडे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच या संदर्भातील माहिती आमदार विक्रमसिंह पाचपुते यांना देखील कळविण्यात आली आहे.दरम्यान, लवकरच कृषी विभागाचे अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करून प्राथमिक माहिती गोळा करणार असून पंचनामे करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. शेतकरी वर्गाला शासनाकडून तातडीने मदत मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शेतकऱ्यांच्या हाती आलेला हंगामाचा घास पावसाने हिरावून घेतल्याने गावागावात हताशतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुकानिहाय पाऊस
रविवारी जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात 33.5 मिलीमिटर पाऊस झाला. नगर 58.5, पारनेर 22.3, श्रीगोंदा 46.7, कर्जत 45.6, जामखेड 66.1, शेवगाव 56.9, पाथडत 110.5, नेवासा 25 मिलीमिटर पाऊस झाला. तर उत्तरेतील तालुक्यांमध्येही पावसाने हजेरी लावली.
सीना नदीला सात दिवसांत तिसऱ्यांदा पूर
अहिल्यानगर शहर व जिल्हयात रविवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसामुळे नगर – कल्याण महामार्गावरील सीना नदीला सात दिवसामध्ये तिसद्यांना पूर आला आहे. त्यामुळे नगर-कल्याण महामार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात आली होती. यंदाच्या पावसाळ्यातील सीना नदीला चौथ्यांदा पूर आला आहे. रविवारी झालेल्या पावसाने नगर शहरासह सीना नदी उगमक्षेत्र परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.