Crime News: एका पाच वर्षांच्या मुलीच्या संशयास्पद मृत्यूनंतर परिसर हादरला आहे. मुलीचा मृतदेह शेजाऱ्याच्या घराजवळ गाडलेल्या अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली. अमेरा ज्युडान अन्वारी असे या मुलीचे नाव असून, तिच्या हत्येचा आणि नरबळीचा संशय व्यक्त केला जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी पप्पू ऊर्फ बाबासाहेब अलाट आणि त्याची पत्नी पूजा अलाट या दाम्पत्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
गोव्यातील कसलये-तिस्क, फोंडा येथे परप्रांतीय अलाट दाम्पत्य कामानिम्मित्त वास्तव्यास आहे. मात्र, त्यांना मूलबाळ नव्हते. त्यामुळे मूल प्राप्ती आणि समृद्धी मिळवण्यासाठी नरबळी दिल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. बुधवारी सकाळपासून बेपत्ता असलेल्या अमेराच्या कुटुंबीयांनी तिला शोधण्याचा प्रयत्न केला. अखेर तिच्या आईने फोंडा पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली.
पोलिसांनी तपासाला गती दिली असता शेजारी राहणाऱ्या बाबासाहेब अलाटकडे संशय गेला. चौकशीदरम्यान तो गडबडलेला दिसला, तसेच असंबंधित उत्तरं देऊ लागल्याने पोलिसांनी अधिक चौकशी केली. त्यानंतरच या अघोरी प्रकाराचा पर्दाफाश झाला. मुलीचा मृतदेह तिच्या राहत्या घराच्या समोर अवघ्या 50 मीटर अंतरावर गाडलेला आढळला. अलाट दाम्पत्यानेच तिला मारून पुरल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हा प्रकार केवळ खून आहे की नरबळी? याचा तपास सध्या सुरू आहे.