जामखेड। नगर सहयाद्री-
कर्जत शहरातील राजीव गांधी नगर परिसरामध्ये राहत असणारा महेश उर्फ दहीशा नर्गीशा काळे (वय ३०) या तरूणाचा काठीने व विटाने मारहाण करून खून केला व पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाखाली पुरून ठेवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. याप्रकरणी दोन आरोपींना कर्जत पोलिसांनी २४ तासाच्या आत अटक केली आहे, तर तिसरा आरोपी फरार झाला आहे.
अधिक माहिती अशी: दि १८ एप्रिल पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान तुषार उर्फ तलाश शिवा काळे, अश्विनी शिवा काळे व गौरी तुषार काळे सर्व राहणार राजीव गांधी नगर झोपडपट्टी कर्जत यांनी फिर्यादीचा भाऊ महेश याचे मोटरसायकलवर अपहरण केले आहे अशी तक्रार दिली होती.दरम्यान या गुन्ह्यातील आरोपी तुषार काळे यास पोलिसांनी अटक केली.
त्याच्याकडून सखोल चौकशी केली असता त्याने आपण महेश नर्गिशा काळे यास मारहाण करून त्याचा खून केला आहे आसे सांगितले व प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने जामखेड तालुक्यातील जवळा येथे दगडाच्या ढिगाऱ्याखाली मृतदेह पुरून ठेवला आहे अशी कबुली पोलिसांकडे दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तलाश उर्फ तुषार शिवा काळे व गौरी तलाश उर्फ तुषार काळे यांना अटक करण्यात आली असून अश्विनी शिवा काळे ही फरार आहे.