महापालिका निवडणूक: मतदार यादीचा ‘मुहूर्त’ पुन्हा लांबणीवर
आता २० नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार प्रारूप यादी
दुबार नावांचा घोळ कायम; निवडणूक आयोगाकडून कार्यक्रमात दुसऱ्यांदा बदल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री
महानगरपालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार यादीच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा बदल करण्यात आला आहे. हा बदल दुसऱ्यांदा झाल्याने निवडणूक प्रक्रियेला ब्रेक लागला आहे.
आयोगाच्या नवीन आदेशांनुसार, प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी आता १४ नोव्हेंबरऐवजी २० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.
प्रारूप यादी प्रसिद्ध झाल्यानंतर, नागरिकांना त्यावर हरकती नोंदवण्यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. आलेल्या हरकतींवर सुनावणी होऊन ५ डिसेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल.
त्यानंतर, ८ डिसेंबर रोजी मतदान केंद्रांची यादी आणि १२ डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
मतदार यादीतील दुबार नावांच्या पडताळणीबाबत राज्य निवडणूक आयोगाने यापूर्वीच आदेश दिले होते. मात्र, अहिल्यानगर शहरासह अनेक महापालिकांमध्ये अद्यापही दुबार मतदारांबाबतचा अहवाल आणि त्यावरील कार्यवाही सुरू झालेली नाही. याच कारणामुळे मतदार यादीच्या कार्यक्रमात पुन्हा बदल करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.



