निवडणुकीपूर्वी दहीहंडी उत्सावात इच्छुकांची शक्तिप्रदर्शनाची चढाओढ
सुनिल चोभे | नगर सह्याद्री
आगामी नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यात होणार्या महापालिका निवडणुकीची चाहूल राजकीय वर्तुळात लागली असून, त्याआधी होणार्या उत्सवांमध्ये राजकीय ज्वर चढल्याचे पहावयास मिळत आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त शनिवारी आणि रविवारी शहर व उनरगरात ठिकठिकाणी दहीहंडी उत्सवांचे मोठ्या थाटात आयोजन करण्यात आले. गोविंदांचा जोश वाढविण्यासाठी सिने तारकांनाही आमंत्रित केले गेले. महापालिकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून अहिल्यानगर शहरासह पुणे, मुंबईच्या पथकांचा जल्लोष दहीहंडी उत्सवांमध्ये पहावयास मिळाला. शहरात आणि ग्रामीण भागात विविध ठिकाणी दहीहंडी फोडणयचा कार्यक्रम जोरात झाला. या कार्यक्रमांतून इच्छुक नेते आणि कार्यकर्त्यांनी आपली ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला.
गेल्या काही वर्षांत निवडणुकीआधीचे धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव हे केवळ सामाजिक ऐक्यापुरते मर्यादित राहत नाहीत, तर ते राजकीय समीकरणांच्या पातळीवरही महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. आयोजक मंडळांना प्रायोजकत्व, बक्षिसांची रक्कम, मांडव सजावट, प्रसिद्धी पोस्टर्स, सोशल मीडिया मोहिमा यामध्ये इच्छुकांची थेट किंवा अप्रत्यक्ष मदत मिळत असल्याने हे उत्सव प्रचाराची सुरुवात मानले जातात.
दहीहंडी उत्सवात उंच मानाने हंड्या, मोठ्या बक्षिसांच्या घोषणा, नामांकित कलाकारांचे कार्यक्रम यामुळे प्रचंड गर्दी खेचली गेली. अशा गर्दीतून इच्छुकांनी महापालिका निवडणुकीसाठी एक प्रकारे लाँचिंगच करून टाकल्याचे दिसून आले. कार्यकर्त्यांना सक्रिय करतानाच मतदारांच्या मनावर आपली छाप पाडताना पहावयास मिळाले. दरवर्षी दहीहंडी आणि गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा होत असला तरी यावर्षी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, दहीहंडीपासून ते गणेशोत्सवापर्यंतची प्रत्येक हालचात राजकीय हेतू ठेवूनच केली जाणार आहे. त्यामुळे येत्या आठवड्यांत शहरात सांस्कृतिक रंगांसोबतच राजकीय रंगही चढणार असल्याचे पहावयास मिळणार आहे.
केडगावमध्ये कोतकरांच्या नेतृत्वाखाली दहीहंडीचा थरार
केडगावमध्ये माजी महापौर संदीप कोतकर यांच्या नेतृत्वाखाली झेंडा चौक लिंक रोड भूषण नगर येथे संदीप दादा कोतकर युवा मंच व विश्वेश्वर प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. दहीहंडी फोडणार्या गोविंदासाठी एक लाख ११ हजार १११ रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले असून मुख्य आकर्षण सिने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होती. रविवारी १७ ऑगस्ट रोजी होणार्या या दहीहंडी उत्सवासाठी कोतकर समर्थकांकडून जय्यत तयारी चालविली आहे. याच उत्सवातून महापालिका निवडणुकीसाठी कोतकर समर्थक शक्तिप्रदर्शन करतील असा राजकीय अंदाज आहे.
नालेगावात हिंदुत्वाची दहीहंडी
नालेगाव चौक येथे भूमिपुत्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून हिंदुत्वाची दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. या दहीहंडीसाठी आमदार संग्राम जगताप, हिंदुत्वावादी नेते सागर बेग, कुंभमेळा फेमस साध्वी हर्षा रिछारिया यांचे मुख्य आकर्षण राहिले. धर्माची गर्जना, हिंदू जागा हो अशा आशयाच्या फलकांमधून हिंदुत्वाचा जयघोष करण्यात आला होता. हिंदुत्वाची दहीहंडी म्हणजे फक्त करमणूक नव्हे तर धर्म जागृतीची भव्य गर्जना असाही संदेश देण्यात आला. सध्या अहिल्यानगर शहरासह राज्यात हिंदुत्वासाठी आमदार संग्राम जगताप, हिंदुत्ववादी नेते सागर बेग यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. दहीहंडी उत्सवातून हिंदुत्वाची गर्जना करण्यात आल्याने भूमिपुत्र प्रतिष्ठानची दहीहंडी नगरमध्ये चर्चेचा विषय ठरली.
या ठिकाणी रंगला दहीहंडीचा थरार
संघर्ष प्रतिष्ठानच्यावतीने दहीहंडी उत्सवसाठी बॉलीवूड अभिनेत्री करिश्मा तन्ना मुख्य आकर्षण तर रिल्स स्टार अनुश्री माने, मानसी सुरवसे, प्रणाली सूर्यवंशी, विक्रम आल्हाट, ओंकार दादा आमंत्रित होते. केडगाव येथे शिवमुद्रा ग्रुप व जगदंबा तरुण मंडळाच्या वतीने रेणुकामाता मंदिर, केडगाव देवी चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. एक लाख ११ हजार १११ रुपये बक्षीस व अभिनेत्री सोनल चौहान मुख्य आकर्षण होते. चौपाटी कारंजा येथे क्रांतिवीर चंद्रशेखर आझाद युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडीचे मुख्य आकर्षण तारक मेहता का उल्टा चष्मा फेम खुशी माळी (सोनू भिडे) होती. अजिंक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीने गंगा उद्यान चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले गेले. यासाठी मुख्य आकर्षण अभिनेत्री सोनल चौहान व एक लाख ५१ हजारांचे बक्षिस ठेवले होते.