फेस रिडिंगद्वारे हजेरीमुळे बनवाबनवी टळणार, उपाययोजनांमुळे नागरिकांनाही सुविधा मिळणार / अस्वच्छतेच्या तक्रारींमध्ये घट होईल : आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे
अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
शहरात साफसफाई करणाऱ्या सफाई कामगारांच्या कामचुकारपणाला आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी लगाम घालण्याची तयारी सुरू केली आहे. सफाई कामगारांना त्यांच्या कार्यक्षेत्रात जाऊन एआय आधारित मोबाईल अँपवर फेस रिडिंगद्वारे हजेरी द्यावी लागणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याचे कार्यक्षेत्र व वेळ यात निश्चित करण्यात आल्याने कोणता कर्मचारी कुठे काम करतोय, कामकाजाच्या वेळेत कार्यक्षेत्रात काम करतोय की नाही, यावर आता थेट नियंत्रण राहणार आहे. त्यामुळे साफसफाईच्या कामात सुधारणा होईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी फेस रिडिंगद्वारे हजेरीसाठी तयार करण्यात आलेल्या मोबाईल अँपची माहिती घेऊन त्याची प्रत्यक्ष चाचणी घेतली. या अँपमध्ये सर्व कामगारांची माहिती, त्यांच्या कामकाजाचे क्षेत्र व कामाची वेळ, हजेरीची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक कामगाराला आता वेळेत कामावर येऊन त्यांना ठरवून दिलेल्या क्षेत्रातील काम पूर्ण करावे लागणार आहे. त्याने काम केले की नाही, हेही यातून स्पष्ट होणार आहे. त्यामुळे ठराविक वेळेत येऊन हजेरी लावत कामात कुचराई करणाऱ्या कामगारांना चाप बसणार आहे. कामगारांच्या हजेरी व गैरहजेरीची माहिती यातून मिळणार आहे. त्याआधारे पगार दिला जाणार आहे. कर्मचारी कामाच्या वेळेत कार्यक्षेत्र सोडून बाहेर गेल्यास तत्काळ त्याच्या वरिष्ठांना याची माहिती मिळणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.
दरम्यान, शहरात काही सफाई कामगार स्वतः कामावर न येता त्यांच्या जागेवर इतर व्यक्ती पाठवतात. मात्र, आता फेस रीडिंग हजेरीमुळे हे प्रकार बंद होणार आहेत. त्यामुळे बदली अथवा बनावट कर्मचारी कामावर दाखवून चुकीची हजेरी लावण्याचे प्रकार टळणार आहेत. या सर्व उपाययोजनांमुळे साफसफाईच्या कामात सुधारणा होईल, नागरिकांना चांगली सुविधा उपलब्ध होऊन अस्वच्छतेच्या तक्रारी कमी होण्यास मदत होईल, असा आशावादही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.