अहिल्यानगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेने गेल्या दोन महिन्यांपासून प्रशासकीय कामकाजासाठी ई ऑफीस प्रणालीचा वापर सुरू केला आहे. बहुतांशी कामकाज, प्रस्ताव, पत्रव्यवहार या प्रणालीद्वारे सुरू आहे. त्यातून कामकाजात गतिमानता येत आहे. पेपरलेस वर्कमुळे पर्यावरणाचेही रक्षण होण्यास मदत होत आहे. एप्रिल महिन्यापासून संपूर्ण कामकाज या प्रणालीद्वारे करण्यात येत आहे. लवकरच नागरी सुविधा, तक्रारीसाठीही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यातून नागरिकांचा वेळही वाचेल व तक्रारींचा वेळेत निपटारा होईल, असा विश्वास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी व्यक्त केला.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले की, अहिल्यानगर महानगरपालिका प्रशासनाने आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत ई-ऑफिस प्रणाली यशस्वीरित्या कार्यान्वित केली आहे. या प्रणालीमुळे महापालिकेतील प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान झाले आहे. यामध्ये दस्तऐवजांची देवाणघेवाण, फायलींचे ट्रॅकिंग, निर्णय प्रक्रियेतील गती आणि जबाबदारी यामध्ये लक्षणीय सुधारणा झालेली आहे. या उपक्रमामुळे कागदांचा वापर कमी झाला असून, ही प्रणाली पर्यावरणपूरक ठरली आहे. वेळेची बचत, कार्यक्षम संवाद आणि फायलींवरील नियंत्रण वाढल्याने प्रशासनाची कार्यशैली अधिक परिणामकारक झाली आहे.
सर्व विभागप्रमुखांना दिवसभरात आलेल्या फायली त्याचदिवशी संध्याकाळी निकाली काढणे, मंजुरी देणे, आवश्यक कार्यवाही करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये हलगजपणा झाल्यास कारवाई केली जात आहे. प्रशासनाचा कारभार नागरिकाभिमुख असणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने लवकरच नागरिकांच्या तक्रारी, सूचना व विविध सुविधा ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू आहे. सध्या, महानगरपालिकेच्या अधिकृत चउ छॠठ या फेसबुक व इन्स्टाग्राम पेजवर नागरिकांनी नोंदवलेल्या तक्रारींची दखल घेऊन त्यावर कार्यवाही केली जात आहे. आता नागरिकांचे काम अधिक सोयीस्कर, सुखकर होण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने 100% डिजिटल प्रणालीचा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या दिशेने प्रक्रिया सुरू आहे, असेही आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सांगितले.