spot_img
ब्रेकिंगमहसूलमंत्री साहेब, पारनेरमध्ये हप्तेखोरीचे रेट कार्ड जोरात!; कोणाचा कोणाला आशीर्वाद! अण्णांचे तोंडावर...

महसूलमंत्री साहेब, पारनेरमध्ये हप्तेखोरीचे रेट कार्ड जोरात!; कोणाचा कोणाला आशीर्वाद! अण्णांचे तोंडावर बोट!

spot_img

विखे समर्थक म्हणायचे, ‘हप्तेगिरी लंकेंच्या आशीर्वादाने’ आता लंके समर्थक म्हणताहेत, ‘विखेंचे आहेत आशिर्वाद’! | अण्णा हजारेंचे हाताची घडी, तोंडावर बोट!
सारीपाट / नगर सह्याद्री –
Ahmednagar Breaking : ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे [Anna Hajare] यांनी संपूर्ण देशात शासकीय भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला आणि त्यातून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली. अधिकार्‍यांना जरबही बसला. मात्र, त्यांच्याच पारनेर तालुक्यात सध्या भ्रष्ट कारभार बोकाळला आहे. महसूल विभागातील हप्तेखोरीने सध्या मोठ्या प्रमाणात जोर धरला असून सामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. तलाठ्यापासून ते तहसीलदारांपर्यंत सार्‍यांचेच रेट कार्ड सुरु आहे. कार्डवर पैसे टाकल्याशिवाय कोणतेही काम व्हायला तयार नाही. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील [Revenue Minister Radhakrishna Vikhe Patilयांच्याच जिल्ह्यात हा संपूर्ण नंगानाच सुरु आहे. एक लाखाची लाच द्यावी लागल्याचा धक्कादायक प्रकार त्यांच्याच समोर उघड झाला असतानाही त्यावर अद्यापही कोणतीच कारवाई नाही. आधीच्या सरकारमध्ये आ. लंके [MLA Nilesh Lanke] यांच्या आशीर्वादाने तहसील कार्यालयाची हप्तेखोरी चालू असल्याचा आरोप त्यावेळी विखे समर्थक करत होते. आता विखेंच्या आशीर्वादाने ही हप्तेखोरी सुरू असल्याचा आरोप आ. लंके समर्थक करत आहेत. आशीर्वाद कोणत्या कामासाठी देत आहोत आणि त्यातून जनतेचीच जिरवली जात असल्याचे वास्तव असताना आता जनतेने न्याय कोणाकडे मागायाचा असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गारपीटग्रस्त गावातील पंचनामे आणि त्यांना मदत करण्याच्या अनुषंगाने पालकमंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट सूचना दिल्या. सलग दोन दिवस तालुक्याचा दौराही केला. मात्र, असे असताना तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्या कामकाजावर कोणताही परिणाम झाला नाही. उलटपक्षी त्यांनी सार्‍यांनाच वार्‍यावर सोडले. तलाठ्यापासून ते नायब तहसीलदारांपर्यंत सार्‍यांचीच मोठी चैन निर्माण करण्यात गायत्री सौंदाणे यशस्वी झाल्या असून रेटकार्डनुसार काम करणार्‍या कर्मचारी-अधिकार्‍यांवर त्यांची मर्जी वाढली आहे.

तहसीलदार म्हणून पदभार घेतल्यापासूनच त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीबाबत नाराजी आहे. वरिष्ठ अधिकारी आणि मंत्री यांच्यासमोर लाळघोटेपणा करायचा आणि त्यांची पाठ फिरताच तालुक्यातील सामान्य जनतेला वेठीस धरत त्यांना लुटण्याचा मोठा उद्योग पारनेरमध्ये सुरू झाला आहे. तहसीलदार सौंदाणे यांच्यासह त्यांच्या हाताखाली काम करणारे अधिकारीही त्याच धर्तीवर काम करत आहेत. प्रांताधिकारी कार्यालय अथवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवायच्या फाईलवर फक्त सही करुन पाठवायची असेल तरीही या दोघांनाही ‘मलिदा’ लागत असल्याचा प्रकार समोर आला आहे.
दप्तरदिरंगाईच्या नव्या नियमानुसार तहसीलदार आणि नायब तहसीलदार यांच्याकडे असणार्‍या फाईल आणि त्यांच्यावर मुदतीत निर्णय का झाला नाही याची तपासणी झाली तरी या दोघांवर कारवाई होऊ शकते. मुदतीत प्रकरणे निकाली न काढण्यामागे आणि प्रकरण वरिष्ठांकडे सादर न करण्यामागे या दोघांचाही मोठा आर्थिक इंटरेस्ट असल्याचे लपून राहिलेले नाही. हप्तेखोरीचे रेटकार्ड चालविणार्‍या या अधिकार्‍यांची बदली न होण्यामागे विखे पाटील यांचा आशीर्वाद असल्याचा जाहीर आरोप आ. नीलेश लंके यांच्या समर्थकांचा आहे.

विखे पाटलांची तालुक्यात यंत्रणा सांभाळणार्‍या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडे सामान्य जनतेने अनेकदा तक्रारी करूनही कारवाई होत नसेल तर याचा अर्थ या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनाही हप्त्यातील काही वाटा जात असेल अशी शंका तालुक्यातील जनतेला येऊ लागली आहे. एकूणच जनतेला कोणीच वाली राहिला नसल्याचे आता समोर येत आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्याच तालुक्यात हा महसूली नंगानाच सुरू असताना त्यांनीही हाताची घडी तोंडावर बोट अशी भूमिका घेतल्याने त्यांच्याही भूमिकेबाबत सामान्य जनतेतून आश्चर्य व्यक्त होत आहे.

सहा महिन्यापूर्वी बदली तरीही कार्यमुक्तीचा मोह सुटेना!
तहसील कार्यालयातील दोन अव्वल कारकुनांची बदली होऊन सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला आहे. या दोघांनाही तातडीने कार्यमुक्त करुन त्यांना त्यांच्या बदलीच्या ठीकाणी पाठवा, असे आदेश पालकमंत्री विखे पाटील यांनी पंधरा दिवसांपूर्वी पारनेरमधील जनता दरबारावेळी प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना दिले होते. मात्र, त्यांच्या आदेशाला या दोघांनीही हरताळ फासला. हे दोघेही खास मर्जीतील आणि ‘कलेक्शन’मधील असल्याने त्यांना बदली आदेश होऊनही सोडले जात नसल्याची ‘नाजूक’ चर्चा आहे. महसूलमंत्र्यांच्या आदेशालाही केराची टोपली दाखवली जात असेल तर सामान्य जनतेच्या प्रश्नांचे काय होत असेल, याचा विचार आता करण्याची वेळ आली आहे.

मंत्रालयातील ओएसडीचे थेट ‘सर्कल’ कनेक्शन!
मुख्यमंत्री कार्यालयात ओएसडी म्हणून काम करत असलेल्या एका अधिकार्‍याचे थेट पारनेरमध्ये लक्ष असते. त्यांच्या हाताखाली ऑफीस बॉय म्हणून काम करणारा ‘भाऊ’ याच्या इशार्‍यावर पारनेर महसूल विभाग काम करत असल्याचे लपून राहिलेले नाही. या दोघांच्या माध्यमातून पारनेरमधील एक सर्कल तहसीलदारांपासून सार्‍यांनाच हातावर खेळवत असल्याची चर्चा आहे. विखे पाटील अथवा आ. लंके या दोघांनाही हातावर खेळवत तालुक्याचे महसूल प्रशासन हलविणार्‍या आणि चालविणार्‍या या सर्कलबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी असून याबाबत काय निर्णय होतो हे पहावे लागणार आहे.

वाळू तस्करांच्या हप्त्यांचे पाकीट; जमा करतोय ‘सर्कल’ अन् तलाठी!
महसूलमंत्री म्हणून पदभार स्वीकारताच राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाळू तस्करांचे कंबरडे मोडले. वाळू तस्करी करताना वाहन आढळून आले तर संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांना जबाबदार धरले जाईल आणि प्रसंगी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे विखे पाटील यांनी इशारावजा महसूल अधिकार्‍यांना सुनावले होते. मात्र, पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौंदाणे यांच्यावर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. विखे पाटलांच्या या आदेशानुसार वाळू तस्करांच्या हप्त्याची रक्कम वाढवून घेण्यात त्यांना यश आले. खासगी व्यक्तीमार्फत होणारी वाळू तस्करांची हप्तेवसुली त्यांना मर्जीतील एका सर्कलमार्फत सुरू केली आहे. टाकळी ढोकेश्वरमध्ये त्याचा केंद्र बिंदू असून त्यासाठी तेथील एक तलाठी ‘सहाय्यक कलेक्टर’ म्हणून भूमिका बजावू लागला आहे. या दोघांना गायत्री सौंदाणे यांचे आशीर्वाद असल्याचे लपून राहिलेले नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...