आयुक्त साहेब, १३ हजार सोडा हो! गळ्यात बेल्ट अन् कानावर व्ही मार्क कट मारलेली फक्त तेराशे कुत्री मोजून दाखवा, जेजुरकरांचा गणपती मंदिरात सत्कार करु!
मोरया रे…. / शिवाजी शिर्के
कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिज़ीकरण या मुद्यावर बाप्पाने आकडेमोड केली होती आणि ती पटणारी होती. कारण ही आकडेमोड करताना बाप्पानं महापालिकेच्याच डॉ. सतीष जेजुरकर या अधिकार्याची साक्ष दिली होती. बाप्पा पुन्हा भेटणार असल्याने त्याच्याकडून यातील अर्थकारण समजून घ्यायच्या विचारात मी पुन्हा कार्यालयात आलो. कार्यालयात दाखल होऊन कामकाज सुरू केलं आणि तितक्यात बेल वाजली. समोर साक्षात बाप्पा!
मी- मोकाट कुत्र्यांच्या मुद्यावर तू काल जे बोललास त्याचाच विचार मी दिवसभर करत राहिलो. दिवसात जास्तीत जास्त १५ कुत्र्यांचे लसीकरण अन् निर्बिज़ीकरण होत असेल तर १३ हजार कुत्र्यांचे निर्बिजीकरण चार महिन्यात कसं शक्य आहे रे?
श्रीगणेशा- व्वा…. माझाच प्रश्न मला विचारतोय! अरे तुम्हा पत्रकार मंडळींनी खरंतर हा प्रश्न आयुक्तांना विचारला पाहिजे. त्याला जाब विचारण्याचे सोडून तू मलाच हे विचारतोस?
मी- बाप्पा, आम्ही सोशीक आहोत रे! नाही आमच्यात हे धाडस! बरं ही नसती झंझट कशाला आमच्या मागे?
श्रीगणेशा- म्हणजेच झंझट मी लावून घेऊ का माझ्या मागे! महापालिकेचा कर तुम्ही भरता ना! तुमच्याच पैशातून या मोकाट कुत्र्यांच्या नावाखाली तिजोरी लुटली जात असेल तर जाब मी का विचारायचा! छत्रपती तुमच्याही घरात जन्माला येऊ दे कधी तरी!
मी- बाप्पा, आम्ही काय बांगड्या भरलेल्या नाहीत! पण, आभाळच फाटलंय रे!
श्रीगणेशा– बरं झालं तूच मान्य केलंस की, आभाळ फाटलंय! मग तुझा आयुक्त असणारा मित्र काय करतोय! आयुक्त कार्यक्षम आहे असं तूच म्हणालास ना! मग, किमान ही मोकाट कुत्री, त्यांचं लसीकरण आणि निर्बिजीकरण ही खायची जागा नाही हे तरी त्या तुझ्या मित्रानं त्या जेजुरकरांना सांगावं ना! हे सांगण्याची हिंम्मत डांगे साहेबांमध्ये नसेल तर जेजुरकरांच्या खाबुगीरीचा वाटा डांगे यांनाही मिळेतोय का अशी शंका घेण्यास वाव मिळतो! कुत्र्यांच्या बाबत केलेल्या दाव्यानुसार प्रतिदिन १५ कुत्रे जरी धरले तरी हे काम १३ हजार कुत्र्यांचे झाल्याचा दावा करणार्या जेजुरकरांना गणित समजून सांगण्याची गरज आहे. चार महिन्यात हे काम कसे झाले यासह या कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्यासाठी पिंपळगाव माळवी, वांबोरी परिसरात केंद्र उभारल्याचे ते जे काही सांगत आहेत ते तर धादांत खोटे आहे. असे कोणतेच केंद्र तिकडे नाही! या कुत्र्यांना नगर शहरात पकडणे, पिंपळगाव माळवीकडे घेऊन जाणे, त्यांचे तेथे लसीकरण आणि निर्बिजीकरण करणे आणि पुन्हा त्यांना नगर शहरात आणून सोडणे असे काम करण्यासाठी एक टेंडर काढल्याचे आणि ते काम दिल्याचे डॉ. जेजुरकर सांगत आहेत. या कामासाठी पैसे दिले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. नगर शहरापासून ते पिंपळगाव माळवीपर्यंतच्या रस्त्यावर कुत्र्यांना घेऊन जाणारे असे कोणतेच वाहन गेल्या चार महिन्यात नगरकरांना दिसले का? दिसलेच असेल तर त्यात कुत्री होती की फक्त जेजुरकर! लसीकरण- निर्बिजीकरण करून ही मोकाट कुत्री नगरमध्ये पुन्हा आणली गेल्याचा दावा सतीष जेजुरकर करत आहेत. नगरकरांनो, या दाव्यात तुम्हाला तथ्य वाटते का? धादांत खोटे बोलायचे आणि तिजोरी लुटायची हेच उद्योग केले जात आहेत. हे थांबणार नक्कीच नाही! अरे तुम्ही सजग नागरीक आहात ना! या ना पुढे मग! विचारा आयुक्तांना जाब! मोकाट कुत्रीही आता काही जणांच्या खायच्या जागा झाली असतील तर आणखी काय काय ही मंडळी खात असतील याचा विचार न केलेलाच बरा! आणखी बारा हजार कुत्र्यांचे लसीकरण आणि निर्बिजीकरण करण्याचे काम हाती घेण्याआधी नगरमध्ये लसीकरण आणि निर्बीजीकरण झालेल्या १३ हजार कुत्र्यांचे निर्बीजीकरण आणि लसीकरण झाले असल्याचे सांगणार्या जेजुरकरांना सोबत घेण्याची माझी तयारी आहे. अरे १३ हजार सोड, जेजुरकरांनी लसीकरण केलेल्या फक्त तेराशे कुत्र्यांची मोजदाद करुन दाखवावी! मोजदाद करताना त्यांनी केलेल्या दाव्यानुसार त्या कुत्र्यांच्या गळ्यात महापालिकेचा बेल्ट आणि कानावर व्ही मार्क कट मारलेला असावा इतकेच!
मी- बाप्पा, जाऊ दे रे! मोकाट कुत्री मोजायचं काम आता आमच्या मनपा प्रशासनाने करायचे का रे!
श्रीगणेशा- हो का नको करायला! मग, शहरात २५ हजार मोकाट कुत्री आहेत हा आकडा कोणी शोधला आणि त्यानुसार त्या कामाचे टेंडर कसे निघाले हेही नगरकरांना समजू दे!
मी- बाप्पा, उगीचच आकंडतांडव नको करू रे! या सार्याचा परिणाम तुझ्या आरोग्यावर होतो! शांतता घे!
श्रीगणेशा- व्वा… किती रे माझ्या आरोग्याची काळजी तुम्हा मंडळींना! तुमच्या विभागाचे म्हणजे परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक असणार्या दत्तात्रय कराळे यांना देखील हीच काळजी असल्याचं माझ्या वाचनात आलं!
मी- कराळे साहेब, याच नगरचे भुमिपुत्र आहेत! त्यांचं नगरवर विशेष प्रेम आहे. अत्यंत खमका अधिकारी आणि तितकाच शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. डीजे बंदी केली पाहिजे आणि ती आरोग्यासाठी आवश्यक असल्याचे त्यांनी ठासून सांगितलं परवा संगमनेरमध्ये!
श्रीगणेशा- खरं आहे त्यांचं म्हणणं! पण, मग त्यांना आडवलं कोणी ही बंदी आणण्यासाठी! सर्वोच्च न्यायालयाचे या अनुषंगाने निवाडे आहेत. त्याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाने देखील डीजेवर बंदी बाबत आणि डेसीबल्सबाबत काही नियम घालून दिले आहेत. अनेक डीजे चालक डेसीबल्सचं उल्लंघन करतात आणि हे करण्यासाठी गल्ली- बोळातील टपोरीछाप पुढारी पोलिसांशीही हुज्जत घालतात! अरे सांग तुमच्या कराळे साहेबांना की, आवरा या डीजे वाल्यांना! पोलिस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांची डीबीे ब्रँच या सार्यांना डीजे चालक कोण, गाडी मालक कोण इथपासून ते त्या मंडळाचा अध्यक्ष, त्याचे पदाधिकारी आणि त्यांना पडद्याआड रसद पुरवणारा गल्लीछाप माहिती असतो. मात्र, यातील कितीजणांच्या विरोधात गुन्हे दाखल केलेत तुमच्या कराळे साहेबांच्या नाशिक विभागातील टीमने! परवा माझ्या स्वागताच्या निमित्ताने नगरमध्ये डेसीबल्सची मर्यादा ओलांडली गेली. कानठळ्या बसल्या! लेजर लाईटवर बंदी असतानाही पोलिस बंदोबस्तात डीजे वाल्यांनी लेजर लाईट नाचवल्या! कराळे साहेबांच्या नगरमधील पोलिसांनी काही डीजे चालकांसह मंडळाच्या पदाधिकार्यांवर गुन्हे दाखल केले. या यादीवर दस्तुरखुद्द कराळे साहेबांनीच नजर मारण्याची गरज आहे. यातील काही मंडळांचे पदाधिकारी बोगस आहेत. त्या मंडळाचा खरा पदाधिकारी भलताच आहे. याशिवाय मंडळांच्या पदाधिकार्याचे पूर्ण नाव माहिती नाही, असा शेरा मारुन गुन्ह्यात त्याला आरोपी केलंय! कराळे साहेब, हे पटतंय का हो तुम्हाला! फक्त आडनाव टाकून सोपस्कर पूर्ण करणार असाल तर ही कारवाई फक्त कागदीच! कराळे साहेब, या आधीही अनेक उत्सवांमध्ये या मंडळांच्या पदाधिकार्यांसह डीजे चालकांवर गुन्हे दाखल झाले आहेत! काय झाले ओ, त्या गुन्ह्यांचे! गुन्हे दाखल झाल्याच्या बातम्या वाचल्या की नगरकरांनाही बरं वाटतं! पण, त्यानंतर त्या गुन्ह्यांचे काय होते यासह त्या पदाधिकारी- मंडळ आणि डीजे चालक यासह सारेच पुन्ह्या त्याच जोशात पुन्हा रस्त्यावर आलेलेे दिसून येतात! या कारवाईला काही अर्थ आहे काय? कराळे साहेब, आपण नगरचे भुमिपूत्र आहात ना! आरोग्याची काळजी खरंच तुम्हाला वाटत असेल तर डीजे बंदी साठी किमान आपण तरी पुढाकार घ्या! नाशिक परिक्षेत्रातील अन्य जिल्ह्यांमध्ये काय निर्णय घ्यायचा तो घ्या! काय कारवाई करायची ती करा! पण, या जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून नगरमध्ये डीजेबंदी साठी आपला दंडुका वापरा! तरच, आरोग्याच्या काळजीबाबत आणि व्यक्त केलेली चिंता खरी असल्याचे जाणवेल! डेसीबल्सची मर्यादा सोडून डीजे वाजलेच तर याचा अर्थ आपण संगमनेरमध्ये पुढारीछाप भाषण ठोकले अशी चर्चा नगरकर करतील! कराळे साहेब, आपण समजदार आहातच! याशिवाय आपण कार्यतत्पर आणि गुन्हेगारांसह नियम तोडणारांची गय करणारे नाहीत ही आपली ओळख पुन्हा एकदा नगरमध्ये माझ्या उत्सवाच्या निमित्ताने दाखवून द्याल हीच अपेक्षा! (मी काही बोलणार तोच, कराळे साहेबांकडून अपेक्षा व्यक्त करणार्या बाप्पाने दुसर्या क्षणाला हातावारे करत ‘निघतो’ असं म्हणत माझा निरोप घेतला!)