spot_img
अहमदनगरघार्गे साहेब; ‌‘खाकी‌’चं ‌‘खमकं पोलिसिंग‌’ कधी?

घार्गे साहेब; ‌‘खाकी‌’चं ‌‘खमकं पोलिसिंग‌’ कधी?

spot_img

 

गुन्ह्याला अटकाव करणारी मजबूत बांधबंदिस्ती कधी? गुन्ह्यातील ‌‘रिस्पॉन्स टाइम‌’ महत्त्वाचा अन्‌‍ तेच खरे पोलिसिंग!

सारीपाट / शिवाजी शिर्के –
काना, मात्रा, वेलांटी असं काहीच नसणाऱ्या आणि सरळ नाव असणाऱ्या शहराचं नामकरण झालं आणि या शहराची नवी ओळख निर्माण झाली. अहमदनगर ऐवजी अहिल्यानगर असं नामकरण झालं असताना आजही ते समाजातील एका घटकाला मान्य व्हायला तयार नाही. केंद्र आणि राज्य सरकारने नव्या बदलाचे सारे सोपस्कर पूर्ण केले असताना व याबाबत शासकीय अधिसुचना निघाली असतानाही नगर शहरातील काही मुुस्लिम बांधवांना अहिल्यानगर हे नाव मान्य नसल्याचे त्यांच्याच वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून समोर आले आहे. अलिकडच्या काही दिवसात जो काही जातीय तणाव नगर शहरात निर्माण झालाय त्याला टोकाची हिंदुत्वाची भूमिका जशी कारणीभूत ठरलीय, तशीच कारणीभूत ठरलीय काही मुुस्लिमांची नामकरणातील भूमिका! ऐतिहासिक नगर शहर ही ओळख आणि गुन्हेगारीचं शहर, दंगलीचं शहर अशी होणं हा सर्वच व्यवस्थांचा नाकर्तेपणा म्हणावा लागेल. भययुक्त वातावरणाचे मळभ कायम असूनही वरकरणी सारे काही आलबेल असल्याचे भासविले जाणे ही निव्वळ धूळफेक. आज नगर शहराच्या नाक्यानाक्यावर टवाळांच्या टोळ्या शहराला आणि सामान्यांना वेठीस धरत असताना सोमनाथ घार्गे यांच्या कप्तान कारकिदतील खमक्या ‌‘पोलिसिंग‌’वर प्रश्न उपस्थित होणारच !

गणेशोत्सव शांततेत पार पडल्यानंतर नवरात्रीचा उत्सव गालबोट लावून गेला. नगर शहरातील जातीय समिकरण बदललं आहे आणि त्यात टोकाचे राजकारण सुरू असल्याचं लपून राहिलेले  नाही. विजयदशमीच्या निमित्ताने रावण दहन कार्यक्रमात मार्केटयार्डच्या लगत असणाऱ्या एका चौकात मुस्लीम वेशभुषा असणारा पुतळा उभा केला गेला. त्याचे दहन करण्यासाठी काही मिनिटांचा अवधी बाकी असताना त्याबाबत पोलिसांना समजले आणि त्यांनी पुढे जाऊन हे सारे थांबवले. त्यातून होणारा अनुचित प्रकार देखील थांबला. मात्र, नगरमध्ये पडद्याआड जे चालू आहे ते अलबेल नक्कीच नाही.

कोठल्यातील दगडफेकीच्या घटनेत अल्पवयीय मुलांचा सहभाग पुढे येणे बरेच काही सांगून जात आहे. अल्पवयीनांचा गंभीर गुन्ह्यांतील सहभाग हा राज्यासह देशभर चिंतेचा विषय ठरत असूनही त्याबद्दल अद्याप म्हणावे तसे गांभीर्य दिसून येत नाही. कोणत्याही गुन्ह्यात अल्पवयीनांचा वाढत चाललेला सहभाग हा पोलिस यंत्रणेसह नगरकरांचीही झोप उडविणारा आहे. त्यामुळे आतापासूनच सावध व्हावे! नगरसारख्या ‌‘रायझिंग‌’ शहरात नक्कीच भूषणावह नाही.

नगर शहरात अलीकडे खुलेआम तलवारी, कोयते, धारदार शस्त्रे मिरवणाऱ्यांनी शब्दश: उच्छाद मांडला आहे. इन्स्टाग्रामसह सर्वत्र फोफावत असलेली ही ‌‘सोशल‌’ गुन्हेगारी भयंकर डोकेदुखी ठरते आहे. नव्या आव्हानांना जन्म देते आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणाऱ्या काही ‌‘रील्स‌’ना चक्क दोन- तीन लाख व्ह्यूज मिळत असतील, तर हे कशाचे द्योतक म्हणावे? खरे तर असे ‌‘रील्स‌’ बनविणाऱ्या आणि ते व्हायरल करणाऱ्यांचीच त्या-त्या भागातून धिंड काढण्याची गरज आहे आणि त्या धिंडेचे ‌‘रील्स‌’ पोलिसांच्या अकाउंटवरून व्हायरल केल्यास या गुन्हेगारीला नक्कीच आळा बसू शकणार आहे. गल्लोगल्ली शस्त्र घेऊन फिरणाऱ्यांना ‌‘खाक्या‌’ दाखविण्याचा प्रघात सुरू झाल्यास सर्वदूर संदेश नक्कीच जाऊ शकतो. गुन्हेगारी आटोक्यात येत नसल्याने पोलिस यंत्रणा आणि ‌‘पोलिसिंग‌’वरच आक्षेप उपस्थित होत असूनही पोलिसांना ते ऐकू जात नाहीत की त्यांनी ऐकू येत नसल्याचे सोंग घेतले आहे हे समजायला मार्ग नाही. पोलिस ठाण्याच्या हद्दींत हाणामाऱ्या, लूटमार, जुगारासह अवैध धंदे, अवैध सिलिंडरचा काळाबाजार यासारखे गुन्हे कमी झालेत असे एकही पोलिस ठाणे नाही.

गुन्हेगारीचा आलेख वाढताच असेल, तर ‌‘यूपी-बिहार‌’मधील ‌‘क्राइम रेट‌’चे दाखले तरी कशासाठी द्यायचे? ‌‘शहर वाढतंय, मग गुन्हेगारीही वाढणारच‌’‌‘आमचा डिटेक्शन रेट बघा‌’ असा दावा करून पोलिस अधिकारी कदाचित हे दावे वा आकडेवारीशी असहमती दर्शवतील; परंतु गुन्हा घडल्यानंतर तेथे पोहोचण्यापेक्षा गुन्हाच घडणार नाही यासाठी मजबूत बांधबंदिस्ती होत असेल, तर ते खरे पोलिसिंग! गुन्ह्यांत ‌‘रिस्पॉन्स टाइम‌’ हा देखील तितकाच महत्त्वाचा ठरत असतो.

पोलिस अधीक्षकांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सारेच बदलत गेले, तशा अनेक चांगल्या संकल्पनाही बंद पडल्या किंवा हेतुपुरस्सर गुंडाळल्या गेल्या. कृष्णप्रकाश प्रसाद यांनी गुन्हेगारांच्या टोळ्यांना वेसण घालून पोलिसांचा दरारा दाखवून दिला होता. राजकीय गुन्हेगारांना सुद्धा त्या काळात धडकी भरायची. आज ती परिस्थिती आहे काय? त्याला जबाबदार कोण? शहराचे विद्रुपिकरण करणाऱ्या फ्लेक्स आणि बॅनरच्या विरोधात मोहीम राबविण्याची गरज आहे.

फ्लेक्स अन्‌‍ बॅनरमुक्त नगर शहर व्हावे अशी भावना ना मनपा आयुक्तांची ना पोलिस अधीक्षकांची!
पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांशी संवादाचा सेतू उभारून आपल्या कामकाजाची चुणूक देण्यातील हातखंडा कमी होताना दिसत आहे.  अधिकाधिक ‌‘सोशल‌’ होण्याच्या नादात ‌‘खमके पोलिसिंग‌’ हरविल्यासारखे आज जाणवते. अनेकदा पोलिस रस्त्यावर दिसतात; परंतु ते कारवाईसाठी नव्हे, तर केवळ या विभागाच्या उपक्रमांच्या ‌‘प्रमोशन‌’साठी अन्‌‍ ‌‘वसुली‌’साठी! पोलिस दलाची आभासी प्रतिमा निर्माण करण्याचे प्रयत्न ही निव्वळ फसवणूक असल्याचे कधीतरी ओळखण्याची गरज आहे.  नगर शहरातच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात वदचा धाक, जरब कमी पडत असल्याची भावना सर्वसामान्य नगरकरांच्या मनात बळावताना दिसते. त्यातूनच मग नागरिक सोशल मीडियात व्यक्त होताना कृष्णप्रकाश यांच्यासारख्या खमक्या अधिकाऱ्यांची आठवण काढताना दिसतात. अर्थात, अलिकडच्या जमान्यात खरोखरच कृष्णप्रकाश यांच्यासारखे अधिकारी पुन्हा भेटतीलच याबाबत साशंकता आहेच!  त्यांनी राजाश्रीत गुंडगीरी मोडून काढली होती. आता किमान ‌‘नाठाळाचे माथी हाणू काठी‌’ या संत तुकोबांच्या अभंगाप्रमाणे तरी वदची वर्तणूक अपेक्षित आहे. टोळक्याची झुंडशाही सुरू असताना नागरिक केवळ बघ्याची भूमिका घेतात, हेही अनाकलनीयच! सामान्यांच्या सहभागाशिवाय गुन्हेगारीला अटकाव घातला जाऊ शकत नाही. किमान अनुचित घटना पोलिसांना कळवण्याचे कर्तव्य तरी नेटाने पार पाडायला हवे.

राजकारण आणि गुन्हेगारीची सरमिसळ अगदी सहज होत असल्याने हा नवा ट्रेंडसुद्धा शहरासाठी तापदायी ठरतो आहे. दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जशा जवळ येतील, तसे अनेक प्रकार वाढत जातील. आपापल्या ‌‘गॉडफादर‌’ लोकप्रतिनिधींच्या छबींसह शहरभर बेकायदा कमानी आणि होर्डिंगवर हे लोक झळकत आहेत. या कमानी नागरिकांच्या जिवावर बेतूनही या अवैध चमकोगिरीला हात लावण्याची हिंमत ना महापालिका दाखवत आहे ना पोलिस यंत्रणा! रेकॉर्डवरील अनेक गुन्हेगार चौकाचौकांतील फलकांवर चमकत असूनही त्यांची हजेरी घेण्याची तसदी घ्यावी असे पोलिसांना का वाटत नाही हा खरा प्रश्न आहे. ऐतिहासीक भूमी ते तिर्थक्षेत्र असणाऱ्या या भूमीच्या प्रवासात नगरची वेगळी ओळख बनली. आपली विशिष्ट लय टिकवत वेगाने पुढे जाणारे शहर म्हणूनही ते मान्यता पावले. अर्थात छोटे खेडे ही उपहासात्मक टिपणी आजही नगरच्या नशिबी आहेच. नगरचे गावपण अद्याप टिकून असल्याने काही वर्षांपर्यंत गुन्हेगारीचे प्रमाणही अल्पच होते. परंतु, आता महानगराच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याने परिस्थिती पूर्णत: बदलली आहे. गुन्हा करून गुन्हेगार सहज इतर जिल्हे वा राज्यांत पसार होतात किंवा बाहेरून येऊन येथे कांड करून पुन्हा पसार होतात हे नव्याने सांगण्याची गरज नाही. वेळ अद्यापही गेलेली नाही.  पोलिस व्यवस्थेनेच गुन्हेगारांचा कर्दनकाळ ठरून जनतेला भयमुक्त करण्याची गरज आहे. तसे घडल्यास अधिकाऱ्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याससुद्धा नगरकर मागे हटणार नाहीत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पुन्हा धो धो पाऊस; नगरसाठी ‘यलो अलर्ट’

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - भारतीय हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार दिनांक ३ ते ४ ऑक्टोबर...

दुहेरी भूमिका घेणाऱ्यांमुळे मोठी अडचण; पारनेरच्या मेळाव्यात अजित पवार यांनी कुणाला काढला चिमटा?, वाचा सविस्तर

पारनेर | नगर सह्याद्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकासकामे आणि राजकारण यावरून आपल्या पक्षातील सहकारी,...

महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे व गवई गटांमध्ये खलबते; किरण काळे व सुशांत म्हस्के यांची प्रमुख उपस्थिती

अहिल्यानगर। नगर सहयाद्री महानगरपालिका निवडणुकीसाठीची अंतिम प्रभाग रचना लवकरच जाहीर होणार आहे. मागील आठवड्यात मातोश्री...

अखेर तस्करीचा पर्दाफाश; गुटख्याने भरलेली कार जप्त तर ट्रक चालकाने ५१ बॅटऱ्या केल्या लंपास, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरात बंदी असलेल्या सुगंधी गुटख्याची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस कोतवाली...