अहमदनगर / नगर सह्याद्री –
राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी सकाळी शहराची कुलदेवता बुऱ्हाणनगरच्या श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतले. खा.सुळे या गुरवारी रात्री नगरला मुक्कामास होत्या. नगरहून पुढच्या दौऱ्यावर जाण्या अगोदर खा.सुळे यांनी शुक्रवारी सकाळी बुऱ्हाणनगरला जावून कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीचे दर्शन घेवून प्रार्थना केली. मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत व अॅड. अभिषेक भगत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी भगत परिवाराच्या वतीने साडीचोळी देऊन खा.सुळे यांचा सत्कार करण्यात आला.
खा.सुप्रिया सुळे म्हणल्या, नगरमधील जागृत तुळजाभवानी देवीच्या दर्शनाने मोठे आत्मिक समाधान मिळाले आहे. सकाळचे देवीचे प्रसन्न रूपाचे दर्शन घेण्याचे मला आज भाग्य लाभले आहे. देवीचे सेवेकरी भगत परिवाराने केलेल्या स्वागतानेही मी भारावून गेले आहे.
मंदिराचे ऐतिहासिक व धार्मिक महत्व सांगताना मंदिराचे मुख्य पुजारी अॅड.विजय भगत म्हणाले, सक्षात तुळजाभवानी देवीने याठिकाणी अनेक वर्ष वास्तव्य केले आहे. तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिराच्या पालखीचा मान भगत कुटुंबियांकडे गेल्या हजारो वर्षांपासून आहे. दरवर्षी मोठ्या उत्साहात नवरात्रोत्सव येथे साजरा केला जातो.
अॅड. अभिषेक भगत यांनी खा.सुप्रिया सुळे यांना यावर्षीच्या नवरात्रोत्सवात तुळजाभवानी देवीच्या दर्शनास येण्याचे निमंत्रण दिले. यावेळी राजेंद्र भगत, सुभाष भगत, अजिंक्य भगत, कुणाल भगत, सौ.दुर्गा भगत, कविता भगत, वैभवी भगत, अंकिता भगत, माजी महापौर अभिषेक कळमकर, शिवसेनेचे विक्रम राठोड, रोहिदास कर्डिले, निलेश मालपाणी व किरण भगत आदींसह नागरिक उपस्थित होते.