अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर शहरात आज एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांची जाहीर सभा होणार होती. या सभेसाठी अहिल्यानगर पोलिसांकडून काही अटी व शर्तीसह परवानगी देखील देण्यात आली होती मात्र आता ही सभा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. अहिल्यानगर पोलिसांनी सभा पुढे ढकलण्याची विनंती केल्यानंतर सभा पुढे ढकल्यात आली असल्याची माहिती इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
अहिल्यानगर शहरात 29 सप्टेंबर रोजी घडलेल्या प्रकरणामुळे खासदार ओवैसींची सभा पुढे ढकलण्यात आली असल्याची माहिती देखील इम्तियाज जलील यांच्याकडून देण्यात आली आहे. आता अहिल्यानगर शहरात 9 ऑक्टोबर रोजी सभा होणार असून 10 तारखेला धुळ्यात सभा घेण्यात येणार अशी माहिती देखील इम्तियाज जलील यांनी दिली आहे.
माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, ओवैसी हे खासदार असून देशभरात कुठेही सभा घेऊ शकतात. आम्हाला पोलिसांनी विनंती केल्याने सभा पुढे ढकलण्यात आली आहे. शहरात काल जो प्रकार घडला त्यामुळे शहरात परिस्थिती गंभीर आहे त्यामुळे आजची सभा पुढे ढकलून 9 तारखेला करण्यात येणार आहे तर 10 तारखेला धुळ्यात सभा होणार आहे.
अहिल्यानगरमध्ये काल घडलेली घटना सुनियोजित होती. जाणून बुजून कालचा प्रकार करण्यात आला. आम्ही तिकडे येऊ नये म्हणून कालची घटना घडली आहे. यामागे नेमकं कोण आहे याचा शोध पोलिसांनी घ्यावा असं देखील इम्तियाज जलील म्हणाले. तसेच अजितदादाच्या राष्ट्रवादीचे काही नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांचे आमदार निवडून आणण्यासाठी त्यांनी प्रयन्त केलेत मात्र ते आमदार आता आपल्या मालकाचे पण ऐकत नाहीत असा टोला इम्तियाज जलील यांनी आमदार संग्राम जगताप यांना लावला.