पारनेर । नगर सहयाद्री:-
पारनेर तालुक्यातील कळस गावात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) यांच्या कुटुंबाची नगर दक्षिणचे खासदार नीलेश लंके यांनी सोमवारी (दि. ९ सप्टेंबर) भेट घेऊन सांत्वन केले. याप्रसंगी त्यांनी कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन तात्काळ वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शासनाकडून त्वरित आर्थिक मदत मिळवण्यासाठी पाठपुरावा केला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत २५ लाख रुपयांची मदत मंजूर करून घेतली. घटनेनंतर अवघ्या काही दिवसांत १० लाख रुपयांची रक्कम आरटीजीएसद्वारे गाडगे कुटुंबाच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असून, उर्वरित रक्कम चार ते पाच दिवसांत दिली जाणार असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. खासदार लंके यांच्या समवेत यावेळी राष्ट्रवादीचे प्रवक्ते जितेश सरडे, कोरठण देवस्थानचे सचिव चंद्रभान ठुबे, सरपंच राहुल गाडगे, भाऊसाहेब गाडगे, बाळासाहेब पुंडे, श्रीकांत डेरे, संतोष काटे, दत्ता म्हस्के, शुभम शिरोळे, दिलीप गुंजाळ, कैलास गाडगे आदी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
खासदार लंके यांनी या कठीण प्रसंगी कुटुंबाला आधार देण्यासाठी सर्वांनी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन केले. त्यांनी गणेश गाडगे यांच्या आत्म्याला शांती मिळावी, अशी प्रार्थना केली.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, खासदार लंके यांच्या तत्परतेमुळे कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे. बिबट्याच्या हल्ल्यांपासून संरक्षणासाठी भविष्यात ठोस उपाययोजना करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.