सांडव्याची उंची वाढवा / खासदार नीलेश लंके यांचे शरद पवार यांना निवेदन
पारनेर | नगर सह्याद्री
पारनेर तालुयाच्या उत्तर भागातील दुष्काळी पट्ट्यातील जनतेसाठी जीवनदायिनी ठरणार्या मांडओहळ मध्यम प्रकल्पाच्या सांडव्याची उंची १ मीटरने वाढवण्याची मागणी खासदार नीलेश लंके यांनी देशाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांच्याकडे केली आहे. या धरणाची सध्याची साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट असून, उपयुक्त साठा ३१० दशलक्ष घनफूट आहे. दरवर्षी परतीच्या पावसामुळे धरण अल्पावधीतच ओव्हरफ्लो होते. यामुळे साठवण क्षमता वाढवण्याची गरज आहे. शरद पवार यांना खासदार निलेश लंके यांनी निवेदन दिले. यावेळी खडकवाडी येथील उद्योजक बजरंग गागरे, राजेंद्र रोकडे, विष्णु शिंदे, कैलास आग्रे आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सांडव्याची उंची १ मीटरने वाढवल्यास गोदावरी खोर्याच्या जल हिशोबावर कोणताही नकारात्मक परिणाम होणार नाही. उलट, यामुळे पारनेर तालुयाच्या जवळपास अर्ध्या भागाला सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच् या टंचाईपासून मुक्ती मिळेल. सदर धरण गोदावरी खोर्यांतर्गत येत असल्याने सांडव्याची उंची वाढवण्यास प्रशासकीय अडचणी येत आहेत. यासंदर्भात खासदार निलेश लंके यांनी शरद पवार यांना पत्र लिहून सहानुभूतीपूर्वक विचार करून संबंधित पातळीवर पाठपुरावा करण्याची विनंती केली आहे. तसेच, आवश्यक प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून धरणाच्या सांडव्याची उंची वाढवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
हा प्रकल्प पूर्ण झाल्यास पारनेर तालुयातील दुष्काळी भागातील शेतकरी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. स्थानिक जनतेने या मागणीला पाठिंबा दर्शवला असून, लवकरात लवकर निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
मांडओहळ मध्यम प्रकल्प हा पारनेर तालुयातील दुष्काळी भागासाठी वरदान ठरू शकतो. धरणाची साठवण क्षमता ३९९ दशलक्ष घनफूट असली, तरी परतीच्या पावसामुळे ते लवकर ओव्हरफ्लो होते. सांडव्याची उंची केवळ १ मीटर वाढवल्यास पाण्याचा साठा वाढेल आणि तालुयातील अनेक गावांना सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा मोठा आधार मिळेल. यामुळे शेती आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. – बजरंग गागरे (खडकवाडी)
दुष्काळमुक्त पारनेरसाठी कटिबद्ध ः खा. नीलेश लंके
मांडओहळ मध्यम प्रकल्प हा शेतकरी बांधवांसाठी आणि स्थानिक जनतेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सांडव्याची उंची वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असून, यासाठी केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार आहे. स्थानिक जनतेच्या हितासाठी आणि दुष्काळमुक्त पारनेरसाठी मी कटिबद्ध आहे, असे खासदार निलेश लंके यांनी सांगितले.