Maharashtra Monsoon:वेळेआधीच दाखल मान्सूनने यंत्रणांची पोलखोल केली आणि मान्सून पुन्हा गायब झाला.. मात्र 3 दिवसांच्या विश्रांतीनंतर मान्सूनने पुन्हा एकदा गर्जना केलीय. त्यामुळेच जुलैच्या पहिल्याच आठवड्यात अरबी समुद्रात चक्राकार वारे वाहू लागल्याने हवामान विभागाने राज्याला ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे.
जुलैच्या पहिल्याच दिवशी मराठवाड्यासह विदर्भ, पश्चिम आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. तर पुढील 4 दिवसांसाठी हवामान विभागाने सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड कोल्हापूर, सातारा, पुणे आणि नाशिक घाटला ऑरेंज आणि यलो अलर्ट दिला आहे. तसेच अरबी समुद्रातील चक्राकार वाऱ्यांमुळे राज्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.
दरवर्षीप्रमाणे पावसात प्रशासकीय यंत्रणेची लक्तरं वेशीला टांगली जाऊ नयेत म्हणून यंत्रणा आधीपासूनच अलर्ट मोडवर आहेत. ज्याठिकाणी धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते अशा ठिकाणी एनडीआरएफच्या टीमही तैनात करण्यात आल्या आहेत. मात्र अतिमुसळधार पावसामुळे होणारा धोका टाळण्यासाठी नागरिकांनीही खबरदारी घ्यायला हवी.