Weather update: भारतात एप्रिल महिन्यातच हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. उत्तर भारतातील अनेक भागांत उष्णतेची लाट जाणवत असतानाच ईशान्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला गेला आहे. हवामान खात्याच्या माहितीनुसार, पश्चिमी विक्षोभ १२ एप्रिलपर्यंत सक्रीय राहणार असून त्याचा परिणाम हवामानावर मोठ्या प्रमाणावर होणार आहे.
या बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली, पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये अचानक हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशात उष्णतेची लाट अधिक तीव्र होणार असून, अनेक भागांमध्ये ‘रेड अलर्ट’ (red Alert) जारी करण्यात आला आहे. आयएमडीच्या अंदाजानुसार, या भागात येत्या दोन दिवसांत उष्णतेचा प्रकोप वाढू शकतो.
हवामान खात्याने म्हटलं आहे की, पश्चिम भारतातील राजस्थानच्या काही भागांत ढगाळ वातावरण तयार होणार असून, वादळासह हलक्याशा पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि अरुणाचल प्रदेशात गडगडाट वाऱ्यांसह पाऊस पडू शकतो. या हवामान बदलामुळे जनजीवनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
देशभरात निर्माण झालेल्या हवामान प्रणालींमुळे दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही पावसाची शक्यता आहे. पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून ते हळूहळू ईशान्य दिशेने सरकत आहे. त्यामुळे तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकातही पावसाचा जोर जाणवेल.
या प्रणालींच्या प्रभावामुळे ताशी ४० ते ५० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
अनेक ठिकाणी गारपीट, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा अनुभव नागरिकांना येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ९ ते ११ एप्रिल दरम्यान बिहार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विशेषतः उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये १० आणि ११ एप्रिलला पावसाची तीव्रता वाढू शकते.