एक कोटीच्या कर्जाचा तगादा; दोघांवर गुन्हा दाखल
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
एक कोटी रुपयांच्या कर्जाची व्याजासह परतफेड करूनही, अधिक पैशांसाठी तगादा लावणार्यांच्या छळाला कंटाळून सारसनगर येथील एका ४२ वर्षीय व्यावसायिकाने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मयुर रंगनाथ खेंडके (वय ४२, रा. त्रिमुर्ती चौक, सारसनगर) असे आत्महत्या केलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी मयूर यांच्या पत्नी पुष्पा मयूर खेंडके (वय ४०) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयूर खेंडके यांनी आरोपी प्रविण अनिल सुंबे (रा. महात्मा फुले चौक, सारसनगर) व पंकज राजु भोसले उर्फ सोनु शेठ (रा. भोसले आखाडा) यांच्याकडून एक कोटी रुपये कर्ज घेतले होते. सदर रक्कम मयूर यांनी व्याजासह परत केली होती. असे असतानाही, दोन्ही आरोपींनी व्याजापोटी आणखी रक्कमेची मागणी करत मयूर यांच्याकडे तगादा लावला होता.
वारंवार होणार्या जाचाला व छळाला मयूर खंडके हे कंटाळले होते. याच नैराश्यातून त्यांनी दि. २९ ऑटोबर रोजी रात्री ९.१६ वाजता विषारी औषध प्राशन केले. त्यांना तातडीने साईदीप सह्याद्री हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच दि. १ नोव्हेंबर रोजी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेनंतर मयूर यांची पत्नी पुष्या खेंडके यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात आरोपी प्रविण सुंबे आणि पंकज भोसले (सोनु शेठ) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंद केला आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांनी पोलीस ठाण्यास भेट दिली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत असून, आरोपी अद्याप अटकेत नाहीत.



