spot_img
अहमदनगरमोलाचा 'हुक' क्लीन बोल्ड करील, सांगा तुमच्या अमोलला!

मोलाचा ‘हुक’ क्लीन बोल्ड करील, सांगा तुमच्या अमोलला!

spot_img

 

एसपी साहेब, नगर शहरात कायद्याचं राज्य आहे की काय द्यायचं राज्य? यशवंत डांगे साहेब, वेळ अजूनही गेलेली नाही, आवरा स्वत:ला!
मोरया रे / शिवाजी शिर्के –
यशवंत डांगे हे माझे मित्र! महापालिकेत आयुक्त म्हणून काम करताना त्यांनी काही चांगले निर्णय नक्कीच घेतलेत! मात्र, तरीही पंकज जावळे यांच्या पाठोपाठ आलेल्या डांगे साहेबांवर बाप्पा गणेशा बोलत राहिला! मित्रावर तुटून पडलेल्या बाप्पाला कसं आवरायचं या विचारात असतानाच मी नगर शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विषय काढला! खरेतर हा विषय आधी बाप्पानेच छेडला होता. तोच धागा पकडत मी विषयांतर करत थांबविण्यात यशस्वी झालो होतो. बाप्पा निरोप घेऊन गेला होता आणि तो पुन्हा भेटणार असल्याने तो काय बोलणार या विचारात सकाळ कधी झाली हेच समजले नाही. नेहमीप्रमाणे कार्यालयात आलो तर बाप्पा गणेशा माझ्या आधी कार्यालयात!

मी– बाप्पा, अरे सारे नगरकर तुझ्या स्वागताला सज्ज़ झालेत अन् तू इथे! ढोल-ताशे, सनई- चौघडे, डीजे अशी अनेक वाद्ये स्वागतासाठी सज्ज झालीत! आणि हो नगरकरांचं अराध्य दैवत समजल्या जाणार्‍या विशाल गणपती मंदिरात तुझ्या नामाचा जयघोष चालू आहे आणि दस्तुरखुद्द या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या हस्ते आरती झालीय.

श्रीगणेशा- व्वा… इमोशनल करतोस का रे मला! काल एका क्षणात तू महापालिकेच्या विषयावरुन दुसर्‍या विषयाकडे नेलंस! आता मी काही बोलूच नये असंच तुझ्या मनात दिसतंय! पण, खरं सागू का! यशवंत डांगे यांनी स्वत:च काही दुरुस्ती केली पाहिजे. तसे झाले नाही तर त्यांचा देखील पंकज जावळे होऊ शकतो. जावळे हे आयुक्त होण्याआधी नगरमध्ये उपायुक्त होते. त्यांना नगरमधील सार्‍यांच्याच सार्‍या रेघा माहिती होत्या! त्यामुळेच त्यांचं धाडस वाढले आणि त्यातून त्यांनी हुक लावायला सुरुवात केली. देशपांडे नावाचा एजंट हुक लावण्यात तरबेज असल्याचं याच पंकज जावळे याने उपायुक्त असतानाच हेरलं होतं. त्यात देशपांडेलाही चटक लागलेली होतीच! साहेबांसाठी मांडवली करताना तो स्वत:साठीही वेगळी मांडवली करायचाच! त्यातून दोघांचाही कार्यक्रम झाला. आता त्याच जावळेंच्या जागी पूर्वी येथेच कार्यरत असणारे तुझे मित्र यशवंत डांगे हे आलेत! असतील तुझे ते मित्र! मात्र, नगरकरांच्या मनात त्यांच्याबद्दल आधीच संशय आहे. हुक लावणार्‍या आणि टक्केवारीच्या भानगडीत जराशी ते गुंतल्याची चर्चा आहे. दिवस एूनही गेलेले नाहीत! मित्र आहेत ना तुझे ते; मग सावध कर त्यांना! नाही तर मला निरोप देण्याआधी कोणत्याही क्षणी त्यांचा देखील कार्यक्रम होऊ शकतो!

मी- बाप्पा, अरे किती शंका घेतोस माझ्या मित्रावर!
श्रीगणेशा- शंका घेत नाही रे! वास्तवाची जाणिव करुन देत आहे. तुझा मित्र आहे ना! मग, तूच त्यांना सावध कर! नसता मित्राचा कार्यक्रम झाल्याची बातमी करण्याचा तुझ्यावरच नामुष्की येऊ नये इतकेच!
मी- बाप्पा, नको करु त्याची काळजी! नगरकरांना चांगला आयुक्त भेटलाय! करतील ते सारे काही नगरकरांच्या मनातील!
श्रीगणेशा- अरे हो! गेले का तुमचे पोलिस अधीक्षक असणारे दुसरे मित्र, राकेश ओला!
मी- अरे काय हे! गेले का म्हणजे? तुला नक्की काय म्हणायचं आहे?
श्रीगणेशा- अरे, माझ्या मनात काहीच नाही! तुम्हा पत्रकार मंडळींना शब्दांचा खेळ खेळता येतो! विशाल गणेश मंदिरात आरतीला आले होते ना, ओला साहेब! मंदिरातून गेले का ते?
मी- हो… हो! सपत्नीक होते ओला साहेब! तुझी आरती करताना त्यांनी नगरकरांना सद्बुद्धी मिळो यासह कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहो असं आर्जव तुझ्या चरणी केलं बरं का!
श्रीगणेशा- भोळ्याभाबड्यासंह सार्‍यांचच आर्जव मी ऐकत आलोय! आगमनाला तुमच्या एसपी साहेबांनी केलेलं आर्जव तर मी नक्कीच ऐकेल! पण… (असं म्हणत, बाप्पाने माझ्या कटाक्ष टाकला आणि कपाळावर आढ्या आणल्या!)
मी- बाप्पा…. पण…. म्हणजे नक्की काय म्हणायचे रे तुला?
श्रीगणेशा- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत जरा बोलणार आहेच मी! पण, त्याआधी नगर शहरात जे काही चालू आहे ना त्याबद्दल चिंता वाटते रे! ओला साहेबांना जिल्हा सांभाळायचा आहे. त्यांच्या कामाचा भार हलका करण्याची जबाबदारी डीवायएसपींसह त्या- त्या पोलिस ठाणे प्रमुखांचीच!
मी- बाप्पा अगदी बरोबर बोललास तू! कर्तव्यदक्ष पोलिस अधीक्षक म्हणून सध्या ते नगरमध्ये काम करत आहेत. नगर शहरात नव्या दमाचा, तरणाबांड डीवायएसपी मिळालाय! अमोल भारती हे नगर शहरात चांगले करताना दिसत आहेत. त्यांची टीम सुद्धा चांगली आहे!

श्रीगणेशा- लागला त्यांचीही वकिली करायला! जातीजातीत तेढ निर्माण झालीय! राजकारणातून एकमेकांना संपविण्याच्या सुपार्‍या देणेच बाकी राहिलंय! भारती हे उमदे- तरुण असतीलही! मात्र, त्यांच्याकडून नगरकरांचा अपेक्षाभंग झालाय! स्वत:च्याच तोर्‍यात आणि हुक लावणार्‍या टोळीचा ते म्होरक्या झालेत असा संशय आता येऊ लागला आहे. ज्या टीमचं तू कौतुक करत आहेस, तीच त्यांची टीम सध्या त्यांच्या बदनामीला कारणीभूत ठरत आहे. साहेबांची मागणी, या दोन शब्दांवर सध्या भारती यांची टीम करताना दिसत असून त्याबाबत नगरकरांमधून संताप व्यक्त होत आहे. पोलिस ठाणे प्रमुखांपासून ते पोलिस शिपायापर्यंत सारेच या टीमच्या अवास्तव मागण्यांना वैतागले आहेत. खरेतर मागणी नक्की कोणाची आहे हे तुला पुढच्या दोन-तीन दिवसांत नक्कीच सांगेल. वास्तव तर समोर आलेच पाहिजे. हुक साहेब लावतोय की त्याची टीम हेही नगरकरांच्या चर्चेत आहे. त्या चर्चेच्या खोलात मी सध्या जात आहे. हुक लावणारा साहेब आहे की साहेबांना बदनाम करणारी त्याची टोळी आहे हेही नगरकरांना समजेल! मात्र, नगर शहरातील कायदा व सुव्यवस्था, कायद्याचा धाक पुरता संपलाय हे नक्की! खुषमस्कर्‍यांच्या टोळीतील अमोल भारती हे बाहेर आले नाही तर नगरकरांच्या संतापाचा भडका होईल आणि त्याचा पहिला बळी ते ठरतील हे नक्कीच!
मी- बाप्पा, काय रे हे ! आगमनाच्या पहिल्याच दिवशी माझ्याच मित्रांवर तुटून पडलास! असतील काही चुका त्यांच्या! शेवटी जो काम करतो, तोच चुकतो रे!

श्रीगणेशा- हेही खरं आहे तुझं! माझ्या स्वागताला सज्ज असताना तिकडे कांदा मार्केटजवळ एका व्यापार्‍याचे पन्नास- साठ लाख रुपये पळवले. त्याच्यावर तलवारीने वार झाले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. पाळत ठेवून त्याला फक्त लुटलेच नाही तर त्याच्यावर वार करण्यात आले. आहे का सांग कायद्याचा धाक! तुुला लै कौतुक अमोल भारतीचं! नगर शहरात चैन स्नॅचिंग, चोर्‍या, विनयभंग, मारहाण, सत्तूर, चाकू- तलवारींचा वापर यासह कायद्याचा धाक संपलाय हे अत्यंत जबाबदारीने सांगतोय! अमोल भारतींच्या सोबत जी टीम करतेय त्या टीमच्या भानगडींमुळेच ते बदनाम होत आहेत हेही वास्तव समजून घे! दुरुस्ती करण्याची संधी अद्याप ही गेलेली नाही. चल निघतो मी! उद्या मोठी भानगड सांगेल तुझ्या एका मित्राची! (बाप्पा, बोलत असतानाच दिसेनासा झाला. मी माझ्या खुर्चीत बसून बाप्पा उद्याच्या भेटीत माझ्या कोणत्या मित्राची कोणती भानगड सांगणार, या विचारात पाण्याचे दोन ग्लास पिलो आणि कामाला सुरुवात केली.)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉल्बी डीजे अन् लेसर लाईट्सचं काय?

पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष | जाताजाता बाप्पा म्हणाला; पुढच्या वर्षी नव्हे रे, रोजच भेटणार मी...

खा. नीलेश लंके यांना पत्र दिलेच नाही?; आ. टिळेकर यांच्याकडून ‘इन्कार’

पारनेर | नगर सह्याद्री:- मी भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. विधान परिषदेचा आमदार म्हणून मी राज्यात...

‘मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून कमी करण्याचे षडयंत्र’

अहमदनगर । नगर सहयाद्री:- शासनाला हाताशी धरून काही विघ्नसंतोषी लोक मुस्लीम समाजाचे नाव मतदार यादीतून...

बिबट्याच्या हल्ल्यात सात शेळ्या गेल्या; ‘या’ परिसरात ‘तीन’ बिबटे

पारनेर । नगर सहयाद्री :- तालुक्यातील पठार भागावरील गारगुंडी येथे गावाजवळील शेख वस्तीवरील आमीनभाई शेख...